ढाका : सध्या भारतीय महिला संघ आणि बांगलादेशच्या संघात वन डे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान बांगलादेशने विजयी सलामी दिली होती, तर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताने १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे आजचा सामना निर्णायक आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ४ बाद २२५ धावा केल्या. २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून स्मृती मानधना आणि हरलीन देओल यांनी अर्धशतकी खेळी केली.
दरम्यान, उप कर्णधार स्मृती मानधना (५९) धावा करून महिमा खातूनच्या गोलंदाजीवर बाद झाली. पण, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या वादग्रस्त विकेटने अनेकांचे लक्ष वेधले. अम्पायरने बाद देताच हरमनने संताप व्यक्त करत स्टम्पच्या दिशेने बॅट भिरकावली. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात असलेली हरमन फसली अन् बांगलादेशी खेळाडूंनी विकेटसाठी अपील केली. खरं तर स्लिपमध्ये झेलचा दावा केला त्यासाठी अपील केली गेली. मात्र, अम्पायरने तिला LBW बाद घोषित करताच हरमनचा राग अनावर झाला. हरमनप्रीत १४ धावा करून तंबूत परतली.
हरमनप्रीत संतापली
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २२५ धावा करून सन्मानजनक लक्ष्य ठेवले. यजमान संघाकडून फरझाना होक हिने १६० चेंडूत १०७ धावांची शतकी खेळी केली. तर शमीमा सुल्ताना (५२), कर्णधार निगर सुल्ताना (२४), आणि सोभना मोस्टरीला नाबाद (२३) धावा करण्यात यश आले. भारताकडून स्नेह राणाला सर्वाधिक (२) बळी घेण्यात यश आले, तर देविका वैद्यने (१) बळी घेतला.