सिल्हेट : सध्या बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत भारत आणि यजमान बांगलादेशचा संघ आमनेसामने होते. भारतीय संघ ४ पैकी ३ सामने जिंकून इथपर्यत पोहचला होता. अशातच भारताने बांगलादेशच्या संघाला चितपट करून स्पर्धेत विजयी चौकार लगावला आहे. मराठमोळ्या स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १५९ धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाला अपयश आले. शेफाली वर्मा आणि कर्णधार मानधनाने केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेशचा दारूण पराभव केला. पाकिस्तानविरूद्ध झालेल्या पराभवानंतर कमबॅक करत भारतीय संघाने बांगलादेशविरूद्ध ५९ धावांनी मोठा विजय मिळवला.
तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून शेफाली वर्मा हिने सर्वाधिक ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली तर स्मृती मानधना (४७) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (३५) धावा करून बाद झाली. बांगलादेशकडून रमुना अहमद हिने ३ बळी पटकावले तर सलमा खातुन हिला १ बळी घेण्यात यश आले. बांगलादेशच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. फरगाना हक्क आणि निगार सुलताना याव्यतिरिक्त कोणत्याच फलंदाला साजेशी खेळी करता आली नाही. अखेर २० षटकांत बांगलादेशचा संघ ७ बाद केवळ १०० धावा करू शकला. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर बांगलादेशच्या फलंदाना अपयश आले. शेफाली वर्माने अष्टपैलू खेळी करून भारताच्या विजयात मोठा हातभार लावला. भारताकडून शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २-२ बळी पटकावले. तर रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - स्मृती मानधना (कर्णधार), शेफाली वर्मा, एस मेघना, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, केपी नवगिरे, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, राजेश्वरी गायकवाड.
७ संघांमध्ये रंगतोय 'सामना' १ ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. आयसीसीने अलीकडेच जाहीर केलेल्या फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला होता, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील २ आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी झाले आहेत. त्यामुळे किताबासाठी सात संघ आमनेसामने असणार आहेत.
ॉ