ढाका : तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना अनिर्णित करण्यात बांगलादेशच्या संघाला यश आले. अटीतटीच्या लढतीत भारतीय फलंदाजांनी सांघिक खेळी करत यजमान बांगलादेशची पळता भुई थोडी केली पण अखेर यजमानांनी पुनरागमन केले. मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान बांगलादेशने विजयी सलामी दिली होती, तर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताने १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे आजचा सामना निर्णायक होता.
तत्पुर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ४ बाद २२५ धावा केल्या. यजमान संघाने २२५ धावा करून सन्मानजनक लक्ष्य ठेवले होते. बांगलादेशकडून फरझाना होक हिने १६० चेंडूत १०७ धावांची शतकी खेळी केली. तर शमीमा सुल्ताना (५२), कर्णधार निगर सुल्ताना (२४), आणि सोभना मोस्टरीला नाबाद (२३) धावा करण्यात यश आले. भारताकडून स्नेह राणाला सर्वाधिक (२) बळी घेण्यात यश आले, तर देविका वैद्यने (१) बळी घेतला.
भारताची सांघिक खेळी पण...
२२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून स्मृती मानधना आणि हरलीन देओल यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताकडून हरलीन देओलने सर्वाधिक (७७) धावांची खेळी केली, तर स्मृती मानधना (५९), हरमनप्रीत कौर (१४) आणि जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद (३३) धावा करून भारताच्या विजयाच्या आशा जिंवत ठेवल्या. पावसामुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला होता. पण पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरू होताच भारताला हरलीन देओलच्या रूपात मोठा झटका बसला. मात्र, मागील सामन्यातील सामनावीर जेमिमाने आजही कमाल करत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. पण जेमिमा (३३) धावांवर नाबाद परतली.
सामना अनिर्णित
अखेरच्या २ षटकांमध्ये भारताला विजयासाठी ९ धावांची गरज होती तर बांगलादेशला १ विकेट हवी होती. सेट फलंदाज जेमिमा खेळपट्टीवर टिकून होती. पण मेघना सिंहला बाद करण्यासाठी बांगलादेशने रणनीती बनवली. मेघनाने ४९वे षटक चांगले खेळले. जेमिमा फलंदाजी करत असताना ४९व्या षटकातील पहिले २ चेंडू निर्धाव गेले. मग तिने एक धाव काढून मेघनाला फलंदाजीची संधी दिली. चौथा चेंडू मेघनाने निर्धाव खेळला तर पाचव्या चेंडूवर चौकार लगावला. सहाव्या चेंडूवर एक धाव काढून मेघनाने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ३ धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूंवर १-१ धाव काढून मेघनाने विजयाकडे कूच केली. पण तिसऱ्या चेंडूवर मेघनाच्या बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला अन् बांगलादेशने भारताच्या तोंडचा घास पळवला आणि सामना अनिर्णित झाला.
Web Title: INDW vs BANW last and final ODI match was a draw, Harleen Deol scored 77, Smriti Mandhana scored 59, Jemimah Rodrigues scored 33 not out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.