Rashi Kanojia : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून तिथे ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज अखेरचा सामना होत असून या सामन्यातून राशी कनौजिया हिने भारतीय संघात पदार्पण केले आहे. कधीकाळी इस्त्री करणाऱ्या आणि भारतीय सेनेत कर्तव्य पार पाडणाऱ्या अशोक कुमार यांच्या लेकीचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राशीने वयाच्या आठव्या वर्षापासून तयारी सुरू केली. राशी एक फिरकीपटू आहे.
राशीचे वडील अशोक कुमार हे भारतीय लष्करातील इलेक्ट्रिशियन पदावरून २०१७ मध्ये निवृत्त झाले. सध्या ते फेमिनाईज कपड्यांचे काम करतात. क्रिकेटर बनून देशासाठी खेळण्याचे राशीचे स्वप्न होते, जे आता पूर्ण झाले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राशीची आई राधा कन्नोजिया यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने ते करून दाखवले ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. ती क्रिकेट खेळायची तेव्हा लोक टोमणे मारायचे. अनेकांनी तिला क्रिकेट खेळू नकोस असा सल्ला दिला. पण आम्ही सातत्याने तिला पाठिंबा देऊन बळ दिले. पेशाने शिक्षिका असलेल्या राशीच्या आईने आपल्या मुलीला क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी एकलव्य स्पोर्ट्स स्टेडियममध्ये भर्ती केले.
भारताची विजयी आघाडीआज बांगलादेश आणि भारत यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेतील शेवटचा सामना होत आहे. सलामीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने यजमानांना पराभवाची धूळ चारली. बांगलादेशच्या संघासाठी आजचा सामना म्हणजे अस्तित्वाची लढाई असाच असणार आहे. पहिला सामना भारताने कर्णधार हरमनप्रीतच्या अप्रतिम अर्धशतकी खेळीमुळे जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात शेफाली वर्माने आपल्या फिरकीच्या तालावर यजमानांना नाचवले. आजचा सामना भारतीय संघाची उप कर्णधार स्मृती मानधनासाठी ऐतिहासिक असणार आहे. कारण मानधना आपला २००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, राशी कन्नोजिया, मिन्नू मणी.