भारतीय महिला क्रिकेट संघ आशिया चषक टी-२० स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानावर उतरणार आहे. शेफाली वर्माची आक्रमक फटकेबाजी आणि स्मृती मानधना हिच्या मोठ्या खेळीकडे चाहत्यांचे लक्ष असेल. शेफालीने स्पर्धेत सर्वाधिक १५८ धावा केल्या. बांगलादेश संघात अनेक फिरकी गोलंदाज असल्याने शेफालीपुढे सुरुवातीपासूनच फटकेबाजीचे आव्हान असेल. भारताने पाकला सात बळींनी, यूएईला ७८ धावांनी आणि नेपाळला ८२ धावांनी नमविले आहे. त्यात शेफाली-स्मृती या जोडीने प्रत्येक वेळी दमदार सलामी दिली होती. बांगलादेशचा मंदगती मारा भारताला अडचणीत आणू शकतो
डावखुरी फिरकीपटू नाहिदा अख्तर आणि युवा फिरकीपटू राबिया खान या दोघींनी ५-५ बळी घेतले आहेत. नाहिदा भारताच्या आघाडीच्या फळीला अडचणीत आणू शकते. कर्णधार हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्स आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा तसेच पूजा वस्त्रकार यांना सावधपणे धावा काढाव्या लागणार आहेत. गोलंदाजीत राधा यादव, रेणुकासिंग ठाकूर आणि पूजा वस्त्रकार यांचा मारा उत्कृष्ट ठरला. भारताने १४० धावा काढल्या तरी या धावा फायनल गाठण्यास पुरेशा ठरू शकतील; कारण बांगलादेशची फलंदाजी बेभरवशाची आहे. सामना : दुपारी २ पासून, थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स, लाइव्ह स्ट्रिमिंग: डिझ्नी हॉटस्टार