India Women vs England Women, Only Test - ९ वर्ष व २५ दिवसानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवशी ७ बाद ४१० धावा उभारून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या डावात ४२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंड महिला संघाचा पहिला डाव १३६ धावांत गुंडाळला. दीप्ती शर्माने ५.३ षटकांत ७ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. दीप्तीने या कसोटीत १९८५ सालच्या भारतीय महिला खेळाडूच्या विक्रमाशी बरोबरी केली.
भारताकडून सथिश शुभा ( ६९), जेमिमा रॉड्रीग्ज ( ६८), यास्तिका भाटीया ( ६६), दीप्ती शर्मा ( ६७) व हरमनप्रीत कौर ( ४९) यांनी दमदार खेळ केला. महिला कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या दिवशी ४०० हून अधिक धावा करणारा भारत हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी १९३५ मध्ये इंग्लंडने क्राईस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद ४३१ धावा केल्या होत्या. त्यांनी न्यूझीलंडचा पहिला डाव ४४ धावांत गुंडाळला होता. अशा प्रकारे या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण ४७५ धावा झाल्या होत्या. २०२२ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी ४४९ धावा झाल्या होत्या, पंरतु यापैकी ऑस्ट्रेलियाने ५ बाद २०४ व इंग्लंडने ९ बाद २४५ धावा केल्या होत्या.