मुंबई : भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या महिला संघाने ट्वेंटी-२० मालिकेत यजमानांचा २-१ असा पराभव केला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून इंग्लिश संघाने विजयी आघाडी घेतली होती. मात्र, रविवारी झालेला अखेरचा सामना जिंकून आपल्या घरच्या चाहत्यांना खुशखबर देण्यात टीम इंडियाला यश आलं. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हे तिन्ही सामने खेळवले गेले. रविवारी झालेल्या सामन्यात भारताच्या युवा शिलेदारांनी चमकदार कामगिरी केली. श्रेयांका पाटील आणि साइका इशाक यांच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला १२६ धावांत गुंडाळले.
१२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने ४ विकेट राखून विजय साकारला. उपकर्णधार स्मृती मानधनाने सर्वाधिक ४७ धावा करून विजयात हातभार लावला. दुसऱ्या सामन्यात केवळ ८० धावांत तंबूत परतलेल्या टीम इंडियानं अखेरच्या सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. श्रेयांका-इशाक या जोडीनं इंग्लिश संघाला आपल्या जाळ्यात फसवलं. सुरूवातीला पॉवरप्लेमध्ये २ बळी पटकावून रेणुका सिंगनं चांगली सुरूवात केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लिश संघाला सुरूवातीपासूनच संघर्ष करावा लागला. भारताच्या डावातील काही षटकांचा अपवाद वगळता इंग्लंडच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी मिळाली नाही. भारताकडून साइका इशाकने २२ धावांत ३ बळी घेतले, तर श्रेयांका पाटीलने १९ धावांत ३ बळी घेण्याची किमया साधली. भारताच्या युवा खेळाडूंनी अष्टपैलू खेळी करून मालिकेचा शेवट गोड केला. इंग्लंडकडून कर्णधार हेदर नाईट (५२) वगळता एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही.
मालिका गमावली पण शेवट गोड सुरूवातीचे दोन सामने गमावल्यानंतर मालिकेचा शेवट गोड करण्याचे आव्हान टीम इंडियासमोर होते. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना यजमान संघाने पाहुण्यांना स्वस्तात माघारी पाठवण्यास सुरूवात केली. निर्धारित २० षटकांत इंग्लिश संघ सर्व बाद केवळ १२६ धावा करू शकला. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला शेफाली वर्माच्या रूपात सुरूवातीलाच मोठा झटका बसला. मात्र, स्मृती मानधनाने सावध खेळी करून विजयाकडे कूच केली, जिला जेमिमा रॉड्रिग्जने (२९) चांगली साथ दिली. स्मृतीने ४८ चेंडूत ४८ धावांची खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.