T20 WC 2023 । नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाला सलामीच्या 2 सामन्यात विजय मिळवता आला मात्र इंग्लिश संघाने भारताला पराभूत करून टीम इंडियाचा विजयरथ रोखला. आज या स्पर्धेत भारतीय संघ आयर्लंडविरूद्ध सामना खेळत आहे. टीम इंडिया आपल्या तिसऱ्या विजयाच्या शोधात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी चमकदार खेळी केली आणि 20 षटकांत 155 धावा करून आयर्लंडसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मराठमोळ्या स्मृती मानधनाने शानदार खेळी करून आयर्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. स्मृतीने 56 चेंडूत 87 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश राहिला.
तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने सुरूवातीपासूनच शानदार खेळी केली. मात्र, संघाची धावसंख्या 62 असताना भारताला शेफाली वर्माच्या (24) रूपात पहिला झटका बसला. त्यानंतर स्मृती मानधनाने डाव सावरला पण तिला साथ देत असलेली भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (13) धांवावर आपल्या ऐतिहासिक सामन्यात स्वस्तात बाद झाली. हरमनप्रीत आणि स्मृती यांच्यात 38 चेंडूत 52 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. तर युवा खेळाडू रिचा घोषला खाते देखील उघडता आले नाही. विकेट पडण्याचे सत्र सुरूच होते पण स्मृतीने ताबडतोब खेळी करून भारताला मजबूत स्थितीत पोहचवले. लक्षणीय बाब म्हणजे स्मृती मानधनाचे 13 धावांसाठी शतक हुकले आणि ती 87 धावांवर बाद झाली. स्मृतीने 56 चेंडूत 87 धावांची यशस्वी खेळी केली. आयर्लंडकडून लॉरा डेलनी हिने सर्वाधिक (3) बळी घेतले, तर ओरला प्रेंडरगास्टला (2) आणि आर्लेन केली (1) बळी घेण्यात यश आले.
हरमनप्रीत कौरसाठी ऐतिहासिक 'सामना'
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी आजचा सामना ऐतिहासिक आहे. कारण 150 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. याशिवाय टीम इंडिया हरमनप्रीतच्याच नेतृत्वात सर्वाधिक ट्वेंटी-20 सामने जिंकली आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: INDW vs IREW Indian team batting first scored 155 for 6 in 20 overs, Smriti Mandhana scored 87 off 56 balls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.