INDW vs NZW 1st ODI Match | अहमदाबाद : भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने सलामीच्या सामन्यात चमक दाखवली. यजमान भारतीय संघाला ४४.३ षटकांत सर्वबाद करुन किवी संघाने भारतीय चाहत्यांना धक्का दिला. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सावध खेळी केली. पण, त्यांच्या संघाची कर्णधार सोफी डिव्हाईन हास्यास्पदपणे बाद झाली. खरे तर झाले असे की, भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा तिच्या चिवट खेळीसाठी प्रसिद्ध आहे. बाराव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर दीप्तीने प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला धाव घेऊ दिली नाही. हा चेंडू निर्धाव गेला. षटक संपले असल्याने सोफी दुसऱ्या टोकाकडे जायच्या प्रयत्नात होती. मात्र, चेंडू दीप्तीच्या हाती असल्याचे माहिती असतानादेखील ती दुसऱ्या टोकाकडे जात होती. तितक्यात दीप्तीने भारताची यष्टीरक्षक यास्तिका भाटियाकडे चेंडू दिला अन् तिने सोफीला धावबाद करण्याची आयती संधी सोडली नाही.
दरम्यान, भारतीय खेळाडूंनी अपील करताच पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेत निर्णय दिला. अखेर मोठ्या स्क्रीनवर न्यूझीलंडची खेळाडू बाद झाल्याचे दाखवण्यात आहे. हा सर्व प्रकार पाहून सोफी डिव्हाईनचाही विश्वास बसला नाही. पण, तिला तिच्या छोट्या चुकीमुळे तंबूत परतावे लागले.
भारताची नियमित कर्णधार हरमनप्रीतला विश्रांती दिल्याने युवा खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली. साइमा ठाकूर न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करत आहे. याशिवाय तेजल हसबनीस हिलादेखील टीम इंडियाची कॅप मिळाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् सर्वबाद २२७ धावा केल्या.
भारताचा संघ -स्मृती मानधना (कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दयालन हेमलथा, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस (पदार्पण), दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, साइमा ठाकूर (पदार्पण), रेणुका ठाकूर.