INDW vs NZW ODI Series : न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताचा महिला संघ जाहीर झाला आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर टीम इंडियाचा प्रवास साखळी फेरीतच संपला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने पराभूत केल्याने भारतीय संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही. २०१६ नंतर प्रथमच भारतावर ही नामुष्की ओढवली. त्यामुळे हरमनप्रीत कौरला वगळून नवीन चेहऱ्याला कर्णधारपदी विराजमान केली जाऊ शकते अशी चर्चा रंगली. मात्र, तूर्त तरी बीसीसीआयने या चर्चांना पूर्णविराम देत पुन्हा एकदा हरमनवर ही जबाबदारी सोपवली आहे. रिचा घोष तिच्या बारावीच्या परीक्षेमुळे या मालिकेला मुकणार आहे, तर आशा सोभना दुखापतीमुळे भारतीय संघाचा हिस्सा नसेल. अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकरला विश्रांती देण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली.
आगामी काळात न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. येत्या २४ तारखेपासून या मालिकेला सुरुवात होईल. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मालिकेतील सर्व तीन सामने खेळवले जातील. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजल्यापासून खेळवले जातील.
वन डे मालिकेचे वेळापत्रक - २४ ऑक्टोबर, पहिला सामना२७ ऑक्टोबर, दुसरा सामना२९ ऑक्टोबर, तिसरा सामना
भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, डी हेमलथा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया, उमा छेत्री, सायली सतगरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, तेजल हसबनीस, सैमा ठाकूर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयांका पाटील.