ICC Women's T20 World Cup 2024 महिलांच्या टी२० विश्वचषकात भारताला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाचा पहिला सामना न्यूझीलंडसोबत होता. पण आता दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आहे. पाकिस्तानने आपला सलामीचा सामना जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजयपथावर परतायचे असेल तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाचा सामना दुबईच्या स्टेडियमवर होणार आहे. ती खेळपट्टी कशी असेल, टॉस जिंकून पहिले फलंदाजी करावी की गोलंदाजी, ते जाणून घेऊया.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी की गोलंदाजी?
दुबई स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीसाठी उपयुक्त आहे. टीम इंडियाचा न्यूझीलंडशी सामना याच मैदानावर झाला. खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय चांगली होती. त्यामुळे न्यूझीलंडने १६० धावा केल्या. मात्र, दुसऱ्या डावात टीम इंडियाची फलंदाजी अतिसामान्य होती, त्यामुळे भारत स्वस्तात बाद झाला. या मैदानावर टी२० मध्ये प्रथम खेळणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या १४१ तर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या १२५ आहे. जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल आणि धावफलकावर मोठी धावसंख्या उभारेल. तर दुसऱ्या डावात दव पडल्याने गोलंदाजांना थोडे अवघड जाऊ शकते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंतची कामगिरी
टी२० क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघातील संघर्षाबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघ एकूण १३ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यापैकी टीम इंडियाने १० सामने जिंकले आहेत तर पाकिस्तानला केवळ ३ वेळा यश मिळाले. T20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ सामने झाले आहेत, त्यापैकी ४ भारताने जिंकले आहेत आणि २ पाकिस्तानने जिंकले.