Join us  

INDW vs SAW : ...अन् स्मृतीनं शब्द पाळला! कर्णधार हरमननं संधी देताच मानधनानं करून दाखवलं

INDW vs SAW 2nd ODI Match Updates : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 10:41 AM

Open in App

INDW vs SAW 2nd ODI : भारतीय महिला संघाने मायदेशात दक्षिण आफ्रिकेला वन डे मालिकेत पराभूत केले. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. बुधवारी झालेला दुसरा सामना ऐतिहासिक ठरला. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार या दोघींनी शतकी खेळी करून धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून देखील दोन शिलेदारांनी शतक झळकावले. मात्र, अखेर भारताने बाजी मारली अन् मालिका खिशात घातली. ऐतिहासिक विजयानंतर भारतीय कर्णधार आणि उपकर्णधार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत हरमन आणि स्मृती यांनी मिश्किल संवाद केल्याचे दिसते. (smriti mandhana and harmanpreet kaur interview)

व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, हरमन स्मृतीला विचारते की, सामन्यात तू बळी घेतलास त्याचा आनंद जास्त होता की शतक झळकावले त्याचा? यावर स्मृती म्हणते, "पहिल्यांदा तू सांग तुला कशाचा जास्त आनंद झाला." मग हरमनप्रीतने सांगितले की, आम्ही या आधी सगळ्यांनी खूप वेळा गोलंदाजी केली. तेव्हापासून स्मृती मला सांगत होती की, मला फक्त एक षटक टाकायची संधी दे... मी बळी घेताच संपूर्ण मैदानाला फेरफटका मारेन. तिने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मैदानात जल्लोष केला. 

भारताची विजयी आघाडी बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ३ बाद ३२५ धावा केल्या. स्मृती मानधनाने १२० चेंडूत १८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १३६ धावा कुटल्या. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरने ८८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०३ धावांची नाबाद खेळी केली. ३२५ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या संघाने कडवी झुंज दिली. त्यांनी निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३२१ धावा केल्या. त्यामुळे भारताने ४ धावांनी विजय साकारला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून कर्णधार लौरा वोल्वार्डट (१३५ धावा) आणि मॅरिजेन कॅप (नाबाद १३५ धावा) यांच्या शतकी खेळी पाहायला मिळाल्या. 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरनमप्रीत कौरस्मृती मानधनाभारतीय क्रिकेट संघ