INDW vs SAW 2nd ODI : भारताच्या महिला क्रिकेट संघाने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बुधवारी झालेला दुसरा सामना ऐतिहासिक ठरला. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार या दोघींनी शतकी खेळी करून धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून देखील दोन शिलेदारांनी शतक झळकावले. मात्र, अखेर भारताने बाजी मारली अन् मालिका खिशात घातली. खरे तर स्मृती आणि हरमनप्रीत यांची खेळी पाहून चाहत्यांना पुरूष संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांची जोडी आठवली.
हरमनप्रीत कौरचा जर्सी नंबर ७ आहे, जो धोनीचाही हाच असतो. तर विराट कोहलीप्रमाणेस्मृती मानधनाचा जर्सी नंबर देखील १८ आहे. स्मृतीने सलग दुसरे शतक झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय कर्णधार आणि उपकर्णधार पाहुण्या संघाची धुलाई करत असल्याचे पाहून चाहत्यांनी धोनी-कोहलीला यात खेचले. "जर्सी नंबर ७ आणि १८ प्रतिस्पर्धी संघाची धुलाई करत आहे", अशा आशयाच्या पोस्ट करत चाहते धोनी, कोहली, मानधना आणि कौर यांचा फोटो शेअर करत आहेत.
बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ३ बाद ३२५ धावा केल्या. स्मृती मानधनाने १२० चेंडूत १८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १३६ धावा कुटल्या. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरने ८८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०३ धावांची नाबाद खेळी केली.
३२५ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या संघाने कडवी झुंज दिली. त्यांनी निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३२१ धावा केल्या. त्यामुळे भारताने ४ धावांनी विजय साकारला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून कर्णधार लौरा वोल्वार्डट (१३५ धावा) आणि मॅरिजेन कॅप (नाबाद १३५ धावा) यांच्या शतकी खेळी पाहायला मिळाल्या.