चेन्नई : भारतीय महिला क्रिकेट संघ शुक्रवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात मैदानावर उतरेल. यावेळी भारताच्या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष लागेल. महिला क्रिकेटपटूंना कसोटी सामना खेळण्याची संधी कमी मिळते. त्यातच, शुक्रवारपासून रंगणाऱ्या या एकमेव सामन्यातून किमान पाच खेळाडूंना कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. जवळपास एक दशकानंतर दोन्ही संघ कसोटीत एकमेकांविरुद्ध खेळतील. या मालिकेआधी भारताने दक्षिण आफ्रिकेला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप दिला होता.
या कसोटी सामन्यासाठी भारताकडून उमा छेत्री, प्रिया पुनिया, साइका इशाक, अरुंधती रेड्डी आणि शबनम शकील यांना पदार्पणाची संधी मिळू शकते. भारतीय महिलांनी गेल्या वर्षी कसोटीत दमदार कामगिरी करताना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला होता. याआधी, भारतीय महिलांनी २०१४ मध्ये म्हैसूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी भारताने एक डाव आणि ३४ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने आतापर्यंत केवळ पाच कसोटी सामने खेळले असून, स्टार फलंदाज स्मृती मानधना सध्या संघातील सर्वांत अनुभवी कसोटीपटू असून तिने सर्वाधिक सहा कसोटी सामने खेळले आहेत. या दोघींसह जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर यांच्यावर भारताची मोठी मदार असेल. चेन्नईची खेळपट्टी फिरकीस पोषक मानली जात असल्याने दीप्ती आणि स्नेह राणा यांचा फिरकी मारा खेळणे दक्षिण आफ्रिकेसाठी आव्हानात्मक ठरू शकेल.