indw vs slw final । पल्लेकले : श्रीलंकेच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा पराभव करून अखेर आशिया चषक जिंकला. याआधी पाचवेळा अंतिम सामना खेळणाऱ्या श्रीलंकेला एकदाही किताब जिंकता आला नव्हता. यंदा मात्र यजमान संघाने बाजी मारत भारताला पराभवाची धूळ चारली. टीम इंडियाने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने सहज विजय मिळवला. भारतीय संघाने क्षेत्ररक्षणात केलेल्या चुकांमुळे यजमानांचा विजय अधिक सोपा झाला. श्रीलंकेने ८ विकेट आणि ८ चेंडू राखून प्रथमच आशिया चषक उंचावला.
श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू आणि हर्षिता माधवी यांनी केलेल्या खेळीमुळे भारताचा पराभव झाला. चमारीने २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ४३ चेंडूत ६१ धावा केल्या, तर माधवीने २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५१ चेंडूत नाबाद ६९ धावा कुटल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये कविषा दिलहारीने (३०) स्फोटक खेळी करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. श्रीलंकेने १८.४ षटकांत लक्ष्य गाठताना २ बाद १६७ धावा करून विजय साकारला. भारताकडून दीप्ती शर्माला एक बळी घेता आला. श्रीलंकेची सलामीवीर विष्मी गुणरत्ने धावबाद झाली.
तत्पुर्वी, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १६५ धावा केल्या. उपकर्णधार स्मृती मानधनाने केलेल्या अप्रतिम खेळीमुळे भारताला सन्मानजन धावसंख्या उभारता आली. स्मृतीने १० चौकारांच्या मदतीने ४७ चेंडूत ६० धावा केल्या. याशिवाय शेफाली वर्मा (१६), उमा छेत्री (९), हरमनप्रीत कौर (११), जेमिमा रॉड्रिग्ज (२९), रिचा घोष (३०), पूजा वस्त्राकर (नाबाद ५ धावा) आणि राधा यादव १ धाव करून नाबाद परतली. यजमान श्रीलंकेकडून कविष्का दिलहारीने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर उदेशिका प्रबोधनी, चामरी अट्टापट्टू आणि सचिनी निसांसला यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
दरम्यान, श्रीलंकेच्या धरतीवर महिलांच्या आशिया चषकाची स्पर्धा पार पडली. एकूण आठ संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात होते. भारताने बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला उपांत्य फेरीत चीतपट करून फायनलमध्ये पोहोचला होता. भारतीय संघाने सर्वाधिक सातवेळा आशिया चषकाचा किताब जिंकला आहे. बांगलादेशने एकदा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेने सहावेळा अंतिम सामने खेळून अखेर यावेळी किताब जिंकण्यात यश मिळवले. आशिया चषकाच्या स्पर्धेनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे.
भारताचा संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, उमा छेत्री, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कान्वेर, रेणुका ठाकूर.
श्रीलंकेचा संघ -चामरी अट्टापट्टू (कर्णधार), विशमी गुणारत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविष्का दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी, हसिनी परेरा, सुगंदिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, सचिनी निसांसला.