Join us  

गोल्डन गर्ल्स! भारतीय महिला संघाने रचला इतिहास; श्रीलंकेवर रोमहर्षक विजयासह जिंकलं सुवर्ण

India Women vs Sri Lanka Women Asian Games Final 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 2:38 PM

Open in App

India Women vs Sri Lanka Women Asian Games Final 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताला ११६ धावांवर रोखले, परंतु त्याला भारतीय गोलंदाजांनीही प्रत्युत्तर दिले. स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या भागीदारीने भारताला सन्माजनक धावसंख्या उभारता आल्या. त्यानंतर १८ वर्षीय तितास साधूने ( Titas Sadhu ) तिच्या पहिल्या दोन षटकांत ३ धक्के देत श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले. भारताने पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकले. आजच्या दिवसातील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. सकाळी नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल सांघिक गटात सुवर्ण जिंकले होते. 

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला तितास साधूने २ षटकांत ३ झटके दिले. हसिनी परेराचा झेल सुटला अन्यथा तितासने चौथी विकेट घेतलीच होती. १८ वर्षीय तितासने तिच्या पहिल्या षटकात अनुष्का संजीवनी व विष्मी गुणारत्ने यांना माघारी पाठवले. त्यानंतर पुढील षटकात श्रीलंकेची यशस्वी फलंदाज चमारी अटापट्टूची विकेट घेत भारताला मोठे यश मिळवून दिले. पण, राजेश्वरी गायकवाडच्या एकाच षटकात हसिनीने षटकार-चौकार खेचले. पण, हसिनीला घाई महागात पडली अन् एका चूकीच्या फटक्याने तिने ( २५) विकेट फेकली. राजेश्वरीने मोठं यश मिळवले.

ओशादी रणसिंघे व निलाक्षी डी सिल्वा यांनी श्रीलंकेचा डाव सावरला, परंतु चेंडू व धावा यांच्यातले अंतर वाढत होते. शेवटच्या ५ षटकांत श्रीलंकेला ४३ धावांची गरज होती. तितासने ४-१-१६-३ असा अप्रतिम स्पेल पूर्ण केला. १७व्या षटकात पूजा वस्त्राकरने २८ धावांची ही भागीदारी तोडल, निलाक्षी  (२३) त्रिफळाचीत झाली. १८ चेंडूंत ३३ धावा श्रीलंकेला हव्या होत्या आणि रणसिंघे ही एकमेव आशेचा किरण होती. दीप्ती शर्माने  ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली, रणसिंघे १९ धावांवर झेलबाद झाली. दीप्तीने १८व्या षटकात ३ धावा दिल्या. श्रीलंकेला ८ बाद ९७ धावाच करता आल्या अन् भारताने १९ धावांनी सामना जिंकला.

तत्पूर्वी, प्रथम  फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी चांगलेच सतावले. स्मृती मानधना ( ४६) आणि जेमिमा रॉड्रीग्ज ( ४२) या दोघांच्या ७३ धावांच्या भागीदारीने टीम इंडियाला सावरले होते, परंतु भारताचे ६ फलंदाज २७ धावांत तंबूत परतल्याने मोठी धावसंख्या उभी राहू शकली नाही. भारताला २० षटकांत ७ बाद ११६ धावाच करता आल्या. 

टॅग्स :आशियाई स्पर्धा २०२३भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध श्रीलंका