India Women tour of Australia, Pink Ball Test : भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात आज एका सुवर्णसामन्याची नोंद झाली. भारतीय महिला संघ प्रथमच पिंक बॉल कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय महिलांनी हा इतिहास लिहिला आणि त्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या स्मृती मानधनानं ( Smriti Mandhana) ऐतिहासिक कामगिरी केली. स्मृती आणि शेफाली वर्मा यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला आहे.
ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची वन डे मालिका २-१ अशी जिंकली, परंतु टीम इंडियानं अखेरचा वन डे सामना जिंकून ऑस्ट्रेलियाची सलग २६ वन डे विजयाची मालिका खंडीत केली. त्यामुळे आत्मविश्वासानं भरलेल्या भारतीय संघानं कसोटीच्या पहिल्या दिवशी चांगला खेळ केला आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. १७ वर्षीय शेफाली आणि स्मृती यांनी ऑसी गोलंदाजांचा सामना करताना पहिल्या विकेटसाठी ९३ धावा जोडल्या. शेफाली ६४ चेंडूंत ४ चौकारांसह ३१ धावांवर माघारी परतली. आक्रमक फटकेबाजी मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शेफालीचा बचावात्मक खेळही सर्वांना भावाला.