India Women vs England Women ODI : कर्णधार हरमनप्रीत कौरने ( Harmanpreet Kaur) आज इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. हर्लिन देओलला सोबतिला घेऊन हरमनप्रीतने ११३ धावांची विक्रमी भागीदारी केलीच. शिवाय वन डे क्रिकेटमधील पाचवे व इंग्लंडविरुद्धचे दुसरे शतक झळकावून भारताला ३३३ धावांपर्यंत मजल मारून दिली. काल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२०त हार्दिक पांड्याने २०व्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूत ३ षटकार हाणले, पण आज हरमनप्रीतने अखेरच्या ११ चेंडूंत ३ षटकार व ५ चौकारांसह ४३ धावा कुटल्या. १०० चेंडूंत तिने १०० धावा केल्या अन् पुढील ११ चेंडूंत ४३ धावा चोपल्या. १९७६नंतर इंग्लंडमध्ये पाहुण्या संघाकडून कँटेबरीत शतक झळकावणारी हरमनप्रीत पहिलीच खेळाडू ठरली. ऑस्ट्रेलियाच्या लॉरेन हिलने हा पराक्रम केला होता.
दुसऱ्याच षटकात शेफाली वर्मा (८) माघरी परतल्यानंतर स्मृती मानधना ( Smriti Mandhana) आणि यास्तिका भाटीया यांनी भारताचा डाव सावरला. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. यास्तिका २६ धावांवर बाद झाली. स्मृतीने ५१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४० धावांवर माघारी परतली. त्यांनंतर हरमनप्रीत व हर्लिन देओल यांनी ११३ धवांची भागीदारी केली. हर्लिनने ७२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. ही इंग्लंडमधील वन डे क्रिकेटमधील भारताकडून चौथ्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली.
हरमनप्रीतने वन डेतील पाचवे आणि इंग्लंडविरुद्धचे दुसरे शतक झळकावले. इंग्लंडविरुद्ध वन डेत शतक झळकावणारी ती पहिली आशियाई महिला कर्णधार ठरली. मिताली राजनंतर आशिया खंडाबाहेर वन डेत शतक झळकावणारी हरमनप्रीत कौर ही दुसरी भारतीय महिला ठरली. मितालीने २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावले होते. शतकानंतर हरमनप्रीतने ४८व्या षटकात दीप्ती शर्मासह २६ धावा चोपल्या. या दोघींनी १६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. हरमनप्रीतने १११ चेंडूंत नाबाद १४३ धावा केल्या. तिच्या खेळीत १८ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. दीप्ती १५ धावांवर नाबाद राहिली आणि भारताने ५ बाद ३३३ धावा केल्या.
इंग्लंडविरुद्धची भारताची ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी २०१७मध्ये भारतीय महिलांनी ३ बाद २८१ धावा केल्या होत्या. भारतीय महिलांची आजची खेळी ही वन डे क्रिकेटमधील दुसरी सर्वोत्तम खेळी आहे. त्यांनी २०१७मध्ये आयर्लंडविरुद्ध २ बाद ३५८ धावा केल्या होत्या. हरमनप्रीतने नाबाद १४३ धावा करताना वन डेत मिताली राजचा कर्णधार म्हणून आतापर्यंत असलेल्या सर्वोत्तम वैयक्तिक नाबाद १२५ धावांचा विक्रम मोडला.
Web Title: INDWvsENGW: 6,4,4,6,4,1,6,4,4,4,0 She scored 43 runs in those 11 balls, Harmanpreet Kaur smashed 143* runs from just 111 balls including 18 fours and 4 sixes, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.