India Women vs England Women ODI : कर्णधार हरमनप्रीत कौरने ( Harmanpreet Kaur) आज इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. हर्लिन देओलला सोबतिला घेऊन हरमनप्रीतने ११३ धावांची विक्रमी भागीदारी केलीच. शिवाय वन डे क्रिकेटमधील पाचवे व इंग्लंडविरुद्धचे दुसरे शतक झळकावून भारताला ३३३ धावांपर्यंत मजल मारून दिली. काल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२०त हार्दिक पांड्याने २०व्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूत ३ षटकार हाणले, पण आज हरमनप्रीतने अखेरच्या ११ चेंडूंत ३ षटकार व ५ चौकारांसह ४३ धावा कुटल्या. १०० चेंडूंत तिने १०० धावा केल्या अन् पुढील ११ चेंडूंत ४३ धावा चोपल्या. १९७६नंतर इंग्लंडमध्ये पाहुण्या संघाकडून कँटेबरीत शतक झळकावणारी हरमनप्रीत पहिलीच खेळाडू ठरली. ऑस्ट्रेलियाच्या लॉरेन हिलने हा पराक्रम केला होता.
इंग्लंडविरुद्धची भारताची ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी २०१७मध्ये भारतीय महिलांनी ३ बाद २८१ धावा केल्या होत्या. भारतीय महिलांची आजची खेळी ही वन डे क्रिकेटमधील दुसरी सर्वोत्तम खेळी आहे. त्यांनी २०१७मध्ये आयर्लंडविरुद्ध २ बाद ३५८ धावा केल्या होत्या. हरमनप्रीतने नाबाद १४३ धावा करताना वन डेत मिताली राजचा कर्णधार म्हणून आतापर्यंत असलेल्या सर्वोत्तम वैयक्तिक नाबाद १२५ धावांचा विक्रम मोडला.