INDWvsENGW: २२ चेंडूंत ९६ धावा, Harmanpreet Kaur आशियाई क्विन! ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडताना इंग्लंडसमोर उभारल्या ३३३ धावा
INDWvsENGW: २२ चेंडूंत ९६ धावा, Harmanpreet Kaur आशियाई क्विन! ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडताना इंग्लंडसमोर उभारल्या ३३३ धावा
India Women vs England Women ODI : पहिली वन डे जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 9:13 PM
India Women vs England Women ODI : पहिली वन डे जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. पहिल्या सामन्यात ९१ धावांची खेळी करणारी स्मृती मानधना ४० धावांवर माघारी परतली, परंतु तिने अनेक मोठे विक्रम मोडले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने ( Harmanpreet Kaur) इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. १९७६नंतर इंग्लंडमध्ये पाहुण्या संघाकडून कँटेबरीत शतक झळकावणारी हरमनप्रीत पहिलीच खेळाडू ठरली. ऑस्ट्रेलियाच्या लॉरेन हिलने हा पराक्रम केला होता. दुसऱ्याच षटकात शेफाली वर्मा (८) माघरी परतल्यानंतर स्मृती मानधना ( Smriti Mandhana) आणि यास्तिका भाटीया यांनी भारताचा डाव सावरला. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. यास्तिका २६ धावांवर बाद झाली. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये ३०००+ धावा करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये मानधनाने तिसरे स्थान पटकावले. माजी कर्णधार मिताली राजच्या नावावर ७८०५ धावा आहेत, तर सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर ३१७५* धावा आहेत. महिला क्रिकेटमध्ये वन डेत सर्वात जलद ३००० धावा करणाऱ्या खेळाडूंत मानधनाने तिसरे स्थान पटकावले. तिने ७६ सामन्यांत हा टप्पा ओलांडला. मितालीने ८८ डावांत हा टप्पा ओलांडला. ऑस्ट्रेलियाची कॅरेन रोल्टन व दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड या संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क ( ६२) व मेग लॅनिंग ( ६४) या अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. स्मृतीने ५१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४० धावांवर माघारी परतली. त्यांनंतर हरमनप्रीत व हर्लिन देओल यांनी १११ धवांची भागीदारी केली. हर्लिनने ७२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. मिताली राज हिच्यानंतर भारताबाहेर वन डे क्रिकेटमध्ये एकाच देशात ५००+ धावा करणारी हरमनप्रीत दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली. मितालीने न्यूझीलंड व इंग्लंडमध्ये अशी कामगिरी केली होती. हरमन व हर्लिन यांनी ११३ धावांची केलेली भागीदारी ही इंग्लंडमधील वन डे क्रिकेटमधील भारताकडून चौथ्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. हरमनप्रीतने १०० चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १०० धावा केल्या. वन डेतील तिचे हे पाचवे आणि इंग्लंडविरुद्धचे दुसरे शतक ठरले. इंग्लंडविरुद्ध वन डेत शतक झळकावणारी ती पहिली आशियाई महिला कर्णधार ठरली. मिताली राजनंतर आशिया खंडाबाहेर वन डेत शतक झळकावणारी हरमनप्रीत कौर ही दुसरी भारतीय महिला ठरली. मितालीने २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावले होते. शतकानंतर हरमनप्रीतने ४८व्या षटकात दीप्ती शर्मासह २६ धावा चोपल्या. या दोघींनी १६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. हरमनप्रीतने १११ चेंडूंत नाबाद १४३ धावा केल्या. तिच्या खेळीत १८ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. दीप्ती १५ धावांवर नाबाद राहिली आणि भारताने ५ बाद ३३३ धावा केल्या.