सिल्हेट : सध्या बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाने सलामीच्या दोन्हीही सामन्यात विजय मिळवून आपला विजयरथ कायम ठेवला आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतीय महिलांनी मलेशियाविरूद्ध डकवर्थ-लुईस नियमानुसार 30 धावांनी विजय मिळवला. भारताशिवाय पाकिस्तानने बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला.
भारताचा सलग दुसरा विजय भारतीय संघाने मलेशियाविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 181 एवढ्या धावा केल्या होत्या. ज्यामध्ये सामनावीर एस मेघनाच्या 53 चेंडूत 69 धावांच्या अर्धशतकी खेळीचा समावेश होता. तिच्याशिवाय शेफाली वर्माने 39 चेंडूत 46 तर ऋचा घोष हिने 19 चेंडूत 33 धावांची नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात मलेशियाची धावसंख्या 5.2 षटकात 2 बाद 16 होती, तेवढ्यात पाऊस आला आणि त्यानंतर सामना पुढे खेळता आला नाही.
या सामन्यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात यजमान बांगलादेशच्या संघाने 20 षटकांत 8 बाद केवळ 70 धावा केल्या. या सोप्या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानच्या संघाने सहज केला. पाकिस्तानने 12.2 षटकात केवळ एक विकेट गमावून विजय मिळवला. सिद्रा अमीनला 36 धावांच्या नाबाद खेळीसाठी तिला 'सामनावीर' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
भारतीय संघाने मलेशियाविरूद्धचा सामना जिंकून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. 4 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना यूएई तर श्रीलंकेचा सामना थायलंडविरूद्ध होणार आहे. साखळी टप्प्यात सर्व सात संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील आणि त्यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. आशिया चषकाचा मागील हंगाम मलेशियाच्या धरतीवर आयोजित करण्यात आला होता, जिथे बांगलादेशने सहा वेळच्या चॅम्पियन भारताचा शेवटच्या चेंडूवर पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते.
७ संघांमध्ये रंगतोय 'सामना' १ ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. आयसीसीने अलीकडेच जाहीर केलेल्या फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला होता, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील २ आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी झाले आहेत. त्यामुळे किताबासाठी सात संघ आमनेसामने असणार आहेत.