India Women's vs New Zealand Women's : ICC Women's World Cup स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघासमोर यजमान न्यूझीलंडने २६१ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवून वर्ल्ड कप स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली होती. या सामन्यात छोटा पांड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूजा वस्त्राकरने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याच पूजाने आज ४ विकेट्स घेत न्यूझीलंडच्या धावांना ब्रेक लावला. ४७व्या षटकात तीने सलग दोन विकेट्स घेत न्यूझीलंडला मोठे धक्के दिले.
नाणेफेक जिंकून मिताली राजने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. सुझी बॅट्स हिला तिसऱ्याच षटकात अप्रतिम फिल्डिंग करताना किवींची सलामीवीर सुझी बॅट्सला धावबाद केले. कर्णधार सोफी डेव्हिन आणि अॅमेलिया केर यांनी किवींचा डाव सावरला. वस्त्राकरने ही भागीदारी तोडताना डेव्हिनला ३५ धावांवर माघारी पाठवले. पण, त्यानंतर केर व अॅमी सॅटरवेट यांनी वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली. केर ६४ चेंडूंत ५० धावांवर बाद झाली. ८४ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ७५ धावा करणाऱ्या सॅटरवेटची विकेट वस्त्राकरने घेतली.
मॅडी ग्रीन ( २७) व कॅटी मार्टीन ( ४१) यांनी अखेरच्या षटकांत चांगला खेळ करताना संघाला ९ बाद २६० धावांपर्यंत मजल मारून दिली. वस्त्राकरने १० षटकांत ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. राजेश्वरी गायकवाडने दोन, तर झुलन गोस्वामी व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.