मुंबई : सध्याच्या घडीला दुखापतीमुळे भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा संघापासून बाहेर आहे. भुवनेश्वरच्या उपचारांमध्ये दिरंगाई केल्याचे म्हटले जात आहे. आता याबद्दल भुवनेश्वरने मौन सोडले असून आपण कधी पुनरागमन करणार हेदेखील त्याने सांगितले आहे.
भुवनेश्वरला स्पोर्ट्स हर्निया झाला असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी भुवनेश्वरची एक चाचणी करण्यात आली होती. यामध्ये त्याला स्पोर्ट्स हर्निया झाल्याचे म्हटले गेले होते. आता त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.
आपल्या दुखापतीबाबत भुवनेश्वर म्हणाला की, " दुखापतीमुळे मी संघाबाहेर होतो. त्यावेळी एक चाचणी करताना मला स्पोर्ट्स हर्निया झाल्याचे समजले. त्यामुळे आता यावर मला उपचार घ्यावे लागणार आहेत. यासाठी साधारणत: शस्त्रक्रीया केली जाते. जर माझ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली तर मी किती दिवस मैदानात उतरू शकणार नाही, हेदेखील मला माहिती नाही."
आपल्या पुनरागमनाबाबत भुवनेश्वर म्हणाला की, " ऑस्ट्रेलियामध्ये होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषकाला अजून काही महिने बाकी आहेत. पण माझ्या डोक्यात या विश्वचषकाचा विचार नक्कीच नाही. माझ्याबाबत बीसीसीआय आणि निवड समिती जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल."