वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीनंतर जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा घोटा दुखावला गेला आणि त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. आता तो वैद्यकिय सल्ल्यासाठी लंडन येथे जाणार आहे. भारताला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आणि तो स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. नोव्हेंबरपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला शमी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे.
शमी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहे आणि तो दुखापतीतून सावरत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी शमीने सरावाला सुरुवात केली होती, परंतु त्याला वेळेत तंदुरुस्त होता आले नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी जाहीर झालेल्या संघात त्याचे नाव नाही. पण, उर्वरित मालिकेतून तो पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार शमी वैद्यकिय सल्ल्यासाठी लवकरच लंडनला रवाना होण्याची शक्यता आहे. त्याच्यासोबत NCA च्या स्पोर्ट्स सायन्स विभागाचे प्रमुख नितिन पटेलही असतील. शमीच्या घोट्याच्या दुखापतीवर पटेल काम करत आहेत. यापूर्वी सूर्यकुमार यादव शस्त्रक्रियेसाठी जर्मनीत गेला होता.
भारत-इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर २ ते ६ फेब्रुवारी ( विशाखापट्टणम), १५-१९ फेब्रुवारी ( राजकोट), २३-२७ फेब्रुवारी ( रांची) आणि ७-११ मार्च ( धर्मशाला) असे कसोटी सामने होणार आहे. रिपोर्टनुसार बीसीसीआयरिषभ पंतलाही लंडनला पाठवण्याच्या तयारीत आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज आयपीएल २०२४ मधून पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ यालाही दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी एक महिना लागू शकतो. शॉ सध्या NCA मध्ये आहे.