न्यूझीलंड संघासाठी भारत दौरा काही खास राहिला नाही. ट्वेंटी-२० मालिकेत त्यांना ०-३ असा पराभव पत्करावा लागला, तर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही त्यांची पाटी ०-१ अशी कोरीच राहिली. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्यांना फटका बसलाच शिवाय कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानही गमवावे लागले. दुसऱ्या कसोटीपूर्वी त्यांचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि त्या कसोटीत किवींना ३७२ धावांनी पराभव पत्करावा लागला. आता केनला दोन महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीमुळे केन हैराण आहे आणि त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले की,''केन विलियम्सन ठिक आहे. पण, त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागू शकते. मागच्या वेळेस जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर आणि आयपीएल व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी तो ८-९ आठवडे विश्रांतीवर होता. आताही तो कदाचित दीर्घ विश्रांतीवर जाऊ शकतो.''
''त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागेल आणि त्यानंतर डॉक्टर त्याला विश्रांतीचा सल्ला देतीलच. केनसाठी हा कठीण काळ असेल. त्याला न्यूझीलंडकडून खेळायला आवडतं आणि त्याला क्रिकेटपासून दूर राहणे पसंत नाही, असेही ते पुढे म्हणाले.
न्यूझीलंडचा संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ही मालिका होणार आहे.