ब्रिस्बेन : सिडनीमध्ये पराभवाच्या उंबरठ्यावर असताना सामना वाचवित ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण करणाऱ्या टीम इंडियापुढे गाबाच्या स्पोर्टिंग विकेटवर कडवे आव्हान राहणार आहे. कारण अव्वल खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे ते निर्णायक कसोटी खेळण्यासाठी उपलब्ध नाहीत. ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी विजयाची गरज आहे, तर भारतीय संघ अनिर्णित निकालानेसुद्धा ट्रॉफी राखण्यात यशस्वी ठरेल.सिडनीमध्ये दुखापतग्रस्त असतानाही धैर्य व लढवय्या बाण्याचे प्रदर्शन करणारे रवीचंद्रन अश्विन, हनुमा विहारी व ऋषभ पंत यांनी लाखो क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.जसप्रीत बुमराह पोटाचे स्नायू दुखावल्यानंतरही खेळला आणि अंगठा फ्रॅक्चर असतानासुद्धा रवींद्र जडेजाची खेळण्याची तयारी होती. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन गोलंदाज असो, वर्णद्वेषी शेरेबाजी करणारे प्रेक्षक असो किंवा यष्टिमागे स्लेजिंग करणारे खेळाडू असो, प्रत्येकाला सडेतोड उत्तर देत सामना अनिर्णित राखला.नव्या दमाचा भारतीय संघ प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहे आणि त्यामुळे नियमित कर्णधार विराट कोहलीला संघाचा अभिमान आहे. आता या संघाला नव्या दशकातील पहिल्या कसोटी सामन्यात अशा मैदानावर खेळायचे आहे, जेथे ऑस्ट्रेलिया संघ १९८८ पासून हरलेला नाही. संघात जडेजा किंवा बुमराह नाही आणि खेळपट्टी खडतर आहे. मयांक अग्रवाल नेटमध्ये सराव करताना दुखापतग्रस्त झाला, तर अश्विन कमरेच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार निर्णायक कसोटी सामना गाबामध्ये खेळला जाणार असल्यामुळे खूश असेल. ऑस्ट्रेलियाने दुखापतग्रस्त विल पुकोवस्कीला वगळले असून, त्याच्या जागी मार्कस हॅरिसला स्थान देण्यात आले आहे. प्रतिस्पर्धी कर्णधाराने इशारा दिला असला, तरी भारतीय फलंदाजांचे त्रिकुट अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व रोहित शर्मा कुठल्याही आव्हानाला सामोेरे जाण्यास सज्ज आहेत. सिडनीचा संकटमोचक विहारी संघात नाही; पण त्याने आदर्श ठेवला आहे आणि पंतकडून गेल्या कामगिरीची पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. रहाणे अँड कंपनी इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि प्रतिकूल परिस्थितीनंतरही सहजासहजी गुडघे टेकणार नाहीत, त्याची यजमान संघाला चांगली कल्पना आहे.
n भारतीय संघ पाचऐवजी चार गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे. अग्रवाल फिट असेल, तर तो तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, तर रोहित व शुभमन गील डावाची सुरुवात करतील. त्यानंतर पुजारा व रहाणे येतील. रवींद्र जडेजाच्या स्थानी पृथ्वी शॉ किंवा रिद्धिमान साहा घेऊ शकतात, पण अष्टपैलू वाशिंग्टन सुंदरच्या नावाचा विचार होऊ शकतो.
n गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. कारण नवदीप सैनी व मोहम्मद सिराज यांना एकूण तीन कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. शार्दुल ठाकूरने दोन वर्षांपूर्वी कसोटीमध्ये १० चेंडू टाकले होते. राठोड यांनी बुमराहबाबत स्पष्ट न सांगता ऑस्ट्रेलियाला विचार करण्यास भाग पाडले, पण हा वेगवान गोलंदाज खेळण्याच्या स्थितीत नसल्याचे वृत्त आहे.
...त्याबाबत निर्णय सकाळी होईल : राठोडवैद्यकीय पथक दुखापत खेळाडूंवर लक्ष ठेवून असून, बुमराह फिट असेल तर खेळेल अन्यथा तो बाहेर बसेल. अंतिम ११ खेळाडूंबाबतचा निर्णय शुक्रवारी सकाळी सामन्यापूर्वी होईल, असे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले.
पेन म्हणाला, ‘आम्हाला येथे खेळणे आवडते. कारण येथील खेळपट्टी शानदार आहे. ही खेळपट्टी कशी असेल, याची मला कल्पना आहे.’
प्रतिस्पर्धी संघभारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गील, चेतेश्वर पुजारा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, रिद्धिमान साहा, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, टी. नटराजन, वाॅशिंग्टन सुंदर.ऑस्ट्रेलिया : टीम पेन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरन ग्रीन, पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेजलवूड.