Injured Tom Banton Celebration Viral Video: खेळ कोणताही असो, सर्व खेळाडू विजय मिळवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतात. विजयाचा आनंद हा कोणत्याही प्रकारचे दु:ख, वेदना विसरायला लावतो. क्रिकेटच्या मैदानावरही अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. असाच एक प्रकार कौंटी क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा फलंदाज टॉम बँटनबाबत दिसून आला. पायाला दुखापत होऊनही संघ विजयी झाल्यावर तो चक्क कुबड्या घेऊन मैदानात आला आणि विजयाचा जल्लोष केला.
शेवटच्या १० मिनिटांत जिंकला सामना
इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सॉमरसेटने रोमहर्षक सामन्यात सरेचा ११२ धावांनी पराभव केला. सरे सामना ड्रॉ करणार अशी अनेकांना आशा होती. शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या १० मिनिटांत या सामन्याचा निकाल लागला. डावखुरा फिरकीपटू जॅक लीच याने शेवटच्या फलंदाजाला बाद करून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. विजयासह मैदानावर उपस्थित असलेले सर्व सॉमरसेट खेळाडू जॅक लीचकडे धावले. त्यात ड्रेसिंग रूममधून टॉम बँटनने सर्वांना आश्चर्यचकित केले. पायाच्या दुखापतीने संघाबाहेर असलेला टॉ बँटन चक्क कुबड्यांच्या आधाराने गेला आणि त्याने खेळाडूंसोबत विजयाचं सेलिब्रेशन केलं. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, सॉमरसेटचा कर्णधार लुईस ग्रेगरी आणि लेफ्ट आर्म स्पिनर जॅक लीच यांनी सामना जिंकवला. १ विकेटची गरज असताना ग्रेगरीने अतिशय आक्रमक क्षेत्ररक्षण लावले. त्याने सर्व क्षेत्ररक्षकांना फलंदाजाच्या आसपास ठेवले. स्ट्राईकवर असलेल्या डॅनियल वॉरॉलला बाद करण्यासाठी ग्रेगरीने ३ स्लिप, १ लेग स्लिप, २ शॉर्ट लेग, १ सिली पॉइंट, १ शॉर्ट मिड ऑन आणि १ फील्डर शॉर्ट कव्हरवर ठेवला. एक खेळाडू विकेटकीपिंग करत आहे. अशा प्रकारे त्याने सर्व १० फिल्डरसह फलंदाजाला घेरले. यामुळे वॉरल दबावाखाली आला आणि लीचच्या चेंडूवर बचाव करण्याचा प्रयत्न करताना LBW आऊट झाला.