नवी दिल्ली- भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला केएल राहुल (KL Rahul) जवळपास वर्षभरानंतर मैदानात परतणार आहे. आगामी आशिया चषक-2022 साठी सोमवारी जाहीर झालेल्या भारतीय संघात केएल राहुलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व असेल. 28 ऑगस्ट रोजी आशिया चषक स्पर्धेत भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. माजी कर्णधार विराट कोहलीही संघात परतला असून तो आशिया चषकात खेळेल.
30 वर्षीय केएल राहुल टॉप ऑर्डरचा फलंदाज असून तो रोहितसोबत सलामीला उतरेल. राहुलने भारतासाठी 56 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2 शतकांसह एकूण 1831 धावा केल्या आहेत. राहुलने अखेरचा सामना IPL मध्ये आरसीबीविरुद्ध खेळला होता. तसेच, रांचीच्या मैदानावर न्यूझीलंडविरोधात 19 नोव्हेंबर 2021 रोजी त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्या सामन्यात राहुलने 49 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 65 धावा केल्या होत्या. आता 9 महिन्यांनंतर तो संघात परणार आहे.
अनेक अडचणींना तोंड देत संघात पुनरागमनकेएल राहुलला कंबरेच्या दुखापतीमुळे खूप त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी तो परदेशात गेला. परतल्यानंतर फिटनेस चाचणीपूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका खेळू शकला नाही. आता अनेक अडचणींवर मात केल्यानंतर तो संघात दिसेल.
राहुलची कारकीर्दराहुलने आतापर्यंत 43 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने 7 शतके, 13 अर्धशतकांच्या जोरावर 2547 धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 5 शतके आणि 10 अर्धशतकांच्या जोरावर एकूण 1634 धावा केल्या आहेत. राहुल विकेटकीपिंगमध्येही निष्णात असून त्याने आयपीएल व्यतिरिक्त कर्नाटकची ही जबाबदारी सांभाळली आहे.