ठळक मुद्देमागचे वर्षभर घरच्या मैदानावर दादागिरी गाजवणा-या भारतीय संघाचे तंत्र परदेशातील खेळपट्ट्यांवर पूर्णपणे उघडे पडले आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेला बेंचवर बसवून ठेवल्यामुळे कर्णधार विराट कोहलीवर टीकेचा भडीमार होत आहे.
डरबन - दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यापासून वेगवेगळया पर्यटनस्थळी सहकुटुंब भटकंती करताना दिसणा-या भारतीय संघाने दुस-या कसोटीतील पराभवानंतर जणू स्वत:ला हॉटेलमध्येच बंदिस्त करुन घेतले आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव झाल्यानंतर आता तिस-या कसोटीत लाज वाचवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. तिस-या कसोटीत कामगिरीत सुधारणा करण्यासाठी टीम इंडियाच्या जोरदार बैठका सुरु असून कर्णधार विराट कोहली प्रत्येक खेळाडूंबरोबर व्यक्तिगत चर्चा करत आहे.
भारताने आधीच ही कसोटी मालिका गमावली आहे. मागचे वर्षभर घरच्या मैदानावर दादागिरी गाजवणा-या भारतीय संघाचे तंत्र परदेशातील खेळपट्ट्यांवर पूर्णपणे उघडे पडले आहे. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा कमावण्यासाठी भारतीय संघाला आणखी एका विजयाची आवश्यकता आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेला बेंचवर बसवून ठेवल्यामुळे कर्णधार विराट कोहलीवर टीकेचा भडीमार होत आहे. कारण रहाणेने परदेशातील खेळपट्ट्यांवर खो-याने धावा केल्या आहेत. पण सध्याचा त्याचा फॉर्म चांगला नसल्यामुळे त्याच्या जागी रोहित शर्माला पसंती देण्यात आली आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारतीय संघातील तीन खेळाडूंनी स्वत:हून चुका करुन जणू आपल्या विकेट बहाल केल्या. सलामीवीर मुरली विजयने केशव महाराजच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककडे झेल दिला. पहिल्या डावात विजय ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरुन त्याला जणू ट्रेन पकडायची घाई झाली होती असे वाटते. महाराजच्या ऑफस्टंम्प बाहेर जाणा-या चेंडूंना खेळण्याचा मोह विजयला आवरता येत नव्हता अखेर त्याने क्विंटन डी कॉककडे सोपा झेल दिला.
सेंच्युरियन कसोटीत पूजाराने पहिलाच चेंडू मिडऑनला तटवून धाव घेण्याचा प्रयत्न केला. खरतर कसोटीत तुमच्याकडे पुरेसावेळ असतो. त्यामुळे कुठलाही धोका न पत्करता तुम्ही धावा जमवू शकता पण पूजारा दुस-या कसोटीच्या दोन्ही डावात रनआऊट झाला. क्रिकेटमध्ये रनआऊट म्हणजे आत्महत्या म्हटली जाते. संघाला गरज असताना पूजारा धावबाद झाल्यामुळे भारताचे दुस-या कसोटीत मोठे नुकसान झाले. कारण पूजारा खेळपट्टीवर नांगर टाकून फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.
त्यानंतर रोहित शर्माचा नंबर लागतो. मुंबईकर अजिंक्य रहाणेची परदेशातील कामगिरी चांगली असूनही त्याच्या जागी रोहितला संधी मिळालीय. पण रोहितला आपला प्रभाव पाडता आलेला नाही. दोन्ही कसोटीत रोहित स्वस्तात बाद झाला. भारतीय खेळपट्टयांवर द्विशतके झळकावणा-या रोहितच्या बॅटमधून धावा जणू आटल्या आहेत. आफ्रिकेत तिन्ही कसोटी सामन्यात पराभव झाला तर भारताच्या आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानाला अर्थ उरणार नाही. त्यामुळे प्रतिष्ठा राखण्यासाठीतरी भारताला तिसरी कसोटी जिंकावीच लागेल.
Web Title: Inquisition begins after SA series loss, India players confined to hotel
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.