Join us  

'तो' तंबूत राहिला, पाणीपुरी विकली अन् आता डबल सेन्च्युरी ठोकली; 'यशस्वी' प्रवासाची गोष्ट

विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी विक्रमी खेळी करून यशस्वी जैस्वाल हे नाव पुन्हा चर्चेत आले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 3:37 PM

Open in App

विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी विक्रमी खेळी करून यशस्वी जैस्वाल हे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबई विरुद्ध झारखंड या सामन्यात यशस्वीनं डबल सेन्चुरी झळकावली. यशस्वीचं वय केवळ 17 वर्ष 292 दिवस... लिस्ट A क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा यशस्वी हा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. या कामगिरीनं यशस्वीनं आपलं नाव इतिहासाच्या पानावर लिहिले. या द्विशतकासह त्यानं महान फलंदाज सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विरेंद्र सेहवाग, शिखर धवन यांच्या पक्तिंत स्थान पटकावलं आहे. 

यशस्वीच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्याच्या यशाला मिळत असलेल्या लखलखाटामागे मनाला हेलावून टाकणारी दुसरी बाजू आहे. तीन वर्ष यशस्वी तंबूत राहिला, पाणीपुरी विकली... क्रिकेटपटू बनण्यासाठी त्यानं जे हाल सोसले, ते डोळ्यात पाणी आणणारे आहेत. पण, त्याचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

मुंबईच्या आझाद मैदान येथील मुस्लीम युनायटेड क्लबच्या तंबूत ग्राऊंड्समनसोबत यशस्वी तीन वर्ष राहिला. एका डेअरी शॉपमध्ये तो काम करायचा, परंतु क्रिकेट खेळून पार थकून जायचा. त्यामुळे काम करताना त्याला झोप यायची. त्यामुळे त्याला मालकानं कामावरून काढून टाकलं होतं. फक्त एक यशस्वी क्रिकेटपटू बनायचंय हे एकच ध्येय उराशी बाळगून तो झटत राहिला. उत्तर प्रदेशातील भदोही गावातील हा युवा खेळाडू. त्याच्या वडिलांचं गावाकडं एक लहानस दुकान आहे. क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं मुंबई गाठली. 

मुंबईत  तो त्याच्या काकांकडे रहायचा, पण घर छोटं असल्यानं सर्वांना तेथे राहणे अवघड जायचे. त्याच्या काकांनी मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांकडे यशस्वीला क्लबमध्ये रहायला देण्याची विनंती केली. त्यानंतर यशस्वी क्लबच्या तंबूत तीन वर्ष राहिला. त्यानं हे त्याच्या घरच्यांना कधीच कळू दिले नाही. त्यांना कळले असते तर यशस्वीची क्रिकेट कारकिर्द तेथेच संपुष्टात आली असती. त्याचे वडील मुंबईला पैसे पाठवायचे, परंतु ते पुरेसे नव्हते. म्हणून यशस्वी आझाद मैदान येथील राम लीला येथे पाणीपूरी व फळ विक्री करायचा. अनेकदा तर त्याला रिकामी पोटी झोपावं लागलं आहे.  

टॅग्स :मुंबईबीसीसीआय