नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्यासाठी धडपडणारा आक्रमक डावखुरा फलंदाज युवराज सिंगने रणजी सामन्यांऐवजी फिटनेस ट्रेनिंगला प्राधान्य दिले आहे. युवराज रणजी स्पर्धेत खेळण्याऐवजी राष्ट्रीय क्रिकेट प्रबोधिनीत फिटनेस टेस्ट पास होण्यासाठी मेहनत घेत आहे. यंदाच्या मोसमात युवराज पंजाबकडून फक्त एका रणजी सामन्यात खेळला. चार सामन्यांवर त्याने पाणी सोडले. विदर्भाविरुद्ध खेळताना त्याने पहिल्या डावात 20 आणि दुस-या डावात 42 धावांची खेळी केली.
युवराजचा राष्ट्रीय क्रिकेट प्रबोधिनीतील हा सराव बीसीसीआयच्या काही पदाधिका-यांना खटकला आहे. दुखापत नसताना युवराज प्रबोधिनीत काय करतोय ? असे प्रश्न काहींनी विचारले आहेत. युवराज यो यो फिटनेस टेस्ट पास होण्यासाठी मेहनत घेत आहे. युवराज या टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने त्याची निवड झाली नव्हती.
भारतीय संघाच फिटनेस बद्दलच धोरण -भारतीय संघात यापुढे निवड होताना कौशल्य हा एकमेव पात्रता यापुढे असणार नाही याचे स्पष्ट संकेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले. संघात निवड होण्यासाठी फिटनेसला प्राधान्य राहणार असून त्यांनतर कौशल्याचा विचार केला जाणार आहे.
यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे? -क्रिक ट्रॅकर वेबसाइटनुसार यो यो फिटनेस टेस्ट ही बीप टेस्टचाच एक प्रकार आहे. डेन्मार्कच्या फुटबॉल मानसोपचार तज्ज्ञ जेन्स बँग्सबो यांनी ह्या पद्धतीचा शोध लावला आहे. यात लेवल एक आणि दोन असे प्रकार आहेत.
कशी वापरली जाते? - लेवल एक हा प्रकार अगदी बीप टेस्ट सारखाच आहे परंतु दोन मध्ये एकदम वेगाने धावणे आणि वेळोवेळी त्यात वाढ करणे अशा गोष्टी कराव्या लागतात. यात 20 मीटर अंतरावर मार्किंग कॉन्ज ठेवले जातात. यात सुरुवातीला हळू हळू सुरु होणारे धावणे बीपच्या आवाजाप्रमाणे वाढत जाते. यात सर्व काम आजकाल सॉफ्टवेअरच्या मदतीने केले जाते.
किती वेळ ?यो यो फिटनेस टेस्ट ही लेवल एक साठी सहा ते 20 मनिटे तर लेवल दोन मध्ये दोन ते दहा मिनिटे चालते.
या खेळातही वापरली जाते ही पद्धत? -गेली अनेक वर्ष फुटबॉल आणि हॉकी या खेळांमध्येही पद्धत वापरली जाते. या दोन्हीतील यो यो टेस्टचे निकाल हे क्रिकेटपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. आजकाल प्रो कबड्डीचा सराव करतानाही कबड्डीपटू ही पद्धत वापरताना दिसत आहेत.