Join us  

PAK vs ENG: पाकिस्तानची लायकीच काढली! इंग्लंडचा संघ दौऱ्यावर येताना सोबत शेफही आणणार

आधी सुरक्षेचा प्रश्न तर आता पाकिस्तानात मिळणाऱ्या जेवणावर खेळाडू नाखूश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 10:59 AM

Open in App

Pakistan vs England Test Series: पाकिस्तानच्या ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यानंतर आता तिथल्या खाद्यपदार्थांच्या व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. इंग्लंडच्या संघाने असा एक निर्णय घेतला आहे जो पाकिस्तानची लायकी काढणारा आणि अक्षरश: अपमान करणाराच आहे. इंग्लंडला १ डिसेंबरपासून पाकिस्तानमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्याआधी बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने आपल्या संघासोबत शेफ म्हणजे आचारीही पाकिस्तानात नेण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंडचे खेळाडू पाकिस्तानमध्ये मिळणाऱ्या जेवणावर खूश नाहीत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, इंग्लंडचा संघ आपल्या शेफसोबत पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. काही खेळाडूंना तिथले जेवण आवडले नाही आणि टी20 मालिकेदरम्यान त्यांना पोटदुखीचा त्रास झाला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमधील खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वेळी मोईन अलीनेही खाण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान मोईन अलीने तेथे दिल्या जाणाऱ्या जेवणावर प्रश्न उपस्थित केले होते. मोईनने कराचीमधले जेवण चांगले होते, पण लाहोरचे जेवण आवडत नसल्याचे वक्तव्य केले होते. या विधानानंतर तब्बल १७ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाच्या पाहुणचारात काहीसा अभाव असल्याचे स्पष्ट झाले.

आधी दहशतवाद्यांची भीती, आता खाद्यपदार्थांवर प्रश्न- पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्था आणि दहशतवादी घटनांमुळे अनेक वर्षे क्रिकेट बंद राहिले. बड्या संघांनी बराच काळ पाकिस्तानचा दौरा करणे टाळले. मात्र आता हळूहळू ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या संघांनी पाकिस्तानमध्ये मालिका खेळायला सुरुवात केली आहे. त्यांना तेथील सुरक्षा व्यवस्थेवर आता विश्वास वाटत असेल, पण पाकिस्तानात दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिकेचे वेळापत्रक- इंग्लंड संघ १७ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना रावळपिंडीत १ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. दुसरी कसोटी ९ डिसेंबरपासून मुलतान येथे होणार आहे. तर तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना १७ ते २१ डिसेंबर दरम्यान कराचीमध्ये खेळवला जाईल.

टॅग्स :ऑफ द फिल्डइंग्लंडअन्नबेन स्टोक्सपाकिस्तान
Open in App