मुंबई : भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांचा मुंबई ट्वेन्टी-20 लीगच्या व्यासपीठावर अपमान झाला. या अपमानानंतर गावस्कर चांगलेच वैतागले होते. अखेर निवेदिका सोनाली बेंद्रेला त्यांची सशर्त माफी मागावी लागली.
गावस्कर हे मुंबई ट्वेन्टी-20 लीगचे कमिशनर आहेत. गावस्करांबाबत ही घटना घडली ती या लीगच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी. गावस्कर हे वरिष्ठ क्रिकेटपटू आहेत. पण या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी गावस्कर यांच्यापेक्षा कनिष्ठ क्रिकेटपटूंना सुरुवातीला बोलावले आणि त्यानंतर गावस्कर यांचा व्यासपीठावर पाचारण केले. त्यामुळे गावस्कर रागावले, अशी चर्चा आहे.
लीगच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि अभिनेता श्रेयस तळपदे हे निवेदकाची भूमिका निभावत होते. या दोघांनी गावस्करांपूर्वी सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकर यांना व्यासपीठावर बोलावले. या गोष्टीचा राग गावस्कर यांना आला.
गावस्कर यांनी काही वेळात या दोन्ही निवेदकांना चांगलेच धारेवर धरले. " तुम्ही सलामीवीर म्हणून माझा उल्लेख केला, पण मग मला दोन क्रिकेटपटूंनंतर का व्यासपीठावर बोलावले," असे गावस्कर यांनी या दोन्ही निवेदकांना सांगितले. गावस्कर मस्करी करत असल्याचे या दोन्ही निवेदकांना सर्वप्रथम वाटले. त्यामुळे त्यांना गावस्कर यांच्या या वक्तव्यावर हसू आवरले नाही. पण गावस्कर मस्करी करण्याच्या मूडमध्ये नव्हते. तुम्ही माझं हसं का करता आहात, असा सवाल गावस्कर यांनी या दोघांनाही विचारला. त्यावेळी गावस्कर यांचा पारा चढला आहे, हे या दोघांनाही कळून चुकले. त्यानंतर गावस्कर यांनी श्रेयसला धारेवर धरले. गावस्कर श्रेयसला म्हणाले की, " तू क्रिकेटवर आधारीत एका सिनेमामध्ये कामही केले आहे. त्यानंतर तू मला अशी वागणूक कशी काय देऊ शकता? "
गावस्कर यांचा पारा आता चढणार, हे सोनालीला कळून चुकले. त्यानंतर लगेगच सोनालीने ‘माफी करा’, अशी थेट मराठीत माफी मागितली. त्यानंतर नेमकं काय सुरु आहे, हे गावस्कर यांनाही कळून चुकले. त्यामुळे त्यांनी मी मस्करी करत होते, असे तोंडदेखले सांगितलेही. पण सुरुवातीला ज्यापद्धतीने गावस्कर या दोघांशी बोलत होते ते पाहता, त्यांना राग आला होता, असे उपस्थित काही मंडळींनी सांगितले.