पणजी : क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया(सीएबीआय) यांनी ब्लाइंड असोसिएशन ऑफ गोवा आणि गोवा क्रिकेट संघटना यांच्या सहकार्याने गोव्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट तिरंगी मालिकेतील सामन्यांचे आयोजन केले आहे. सोमवारी स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात खेळविण्यात येईल.
ही स्पर्धा बंगळुरू आणि गोव्यात खेळविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा असल्याने गोमंतकीय क्रिकेटप्रेमींसाठी ही सुवर्णसंधी असेल. स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. पर्वरी येथील जीसीएच्या अकादमी मैदानावर ९ रोजी सकाळी १० वाजता भारत-इंग्लंड यांच्यातील पहिला सामना खेळविण्यात येईल. या सामन्यांसाठी अधिकाधिक क्रिकेट चाहत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ब्लाइंड क्रिकेट असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष कमलाकांत शिरोडकर यांनी केले आहे.
दरम्यान, समर्थनम आणि क्रिकेट असोसिएशन फॉर दी ब्लाइंड इन इंडिया आयोजितआंतरराष्ट्रीय द्विपक्षीय आणि तिरंगी क्रिकेट सामान्यांची मालिका २ ऑक्टोबरपासून सुरु झाली होती. बेंगळुरू येथे ३ व्दिपक्षीय आणि २ त्रिकोणीय सामने नुकतेच पार पडले.
स्पर्धेचे वेळापत्रक असे : ५ रोजी भारत वि. इंग्लंड (बंगळुरू), ६ रोजी भारत वि. श्रीलंका (बंगळुरू), ८ रोजी इंग्लंड वि. श्रीलंका (पर्वरी), ९ रोजी भारत वि. इंग्लंड (पर्वरी), १० रोजी भारत वि. श्रीलंका (पर्वरी), ११ रोजी इंग्लंड वि. श्रीलंका (पर्वरी), १२ रोजी उपांत्य सामना (पर्वरी), १३ रोजी अंतिम सामना (पर्वरी).