मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने गुरुवारी मुलाखत निश्चित केली आहे. या पदासाठी एकूण २८ जणांनी अर्ज केला असून तीन नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या अर्जामध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन आणि हर्र्शेल गिब्स यांच्याबरोबर रमेश पोवार यांचाही अर्ज आहे. रमेश पोवार यांचीच पुन्हा यापदी वर्णी लागण्याची अधिक शक्यता असल्याचे सूत्रांचे मत आहे.
महिला टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पत्करावी लागलेली हार आणि प्रशिक्षक रमेश पोवार-मिताली राज यांच्यात झालेला वाद यामुळे बीसीसीआयला नव्या प्रशिक्षकाचा शोध होता. त्यामुळे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार या तिघांव्यतिरिक्त भारताचा माजी गोलंदाज मनोज प्रभाकर, माजी क्रिकेटपटू टॉम मूडी, डेव्ह व्हॉटमोर, व्यंकटेश प्रसाद, रे जेनिंग्ज हेदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकापर्यंत पोवार यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ संपताच नव्याने अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार २० डिसेंबरला माजी खेळाडू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची समिती उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराशी बीसीसीआय दोन वर्षांचा करार करणार असून त्याला वार्षिक ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळेल.पोवार-एडुल्जी यांच्यावर झाले आरोपपोवार यांना विरोध होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. पोवार व हरमनप्रीत कौर यांनी मिताली राजला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मितालीने पोवार व डायना एडुल्जी यांच्यावर अरोप केला. पोवार यांनीही सलामीला पाठविण्यात न आल्याने मितालीने निवृत्तीची धमकी देत संघात दुफळी निर्माण केल्याचा आरोप करताच वादाला वेगळे वळण लागले.