Join us  

Inv Vs Pak : प्रसारक, प्रायोजकांच्या दडपणामुळेच ‘राखीव दिवस’

पाऊस सुरूच राहिल्यास प्रसारकांचा खिसा होऊ शकतो रिकामा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 5:26 AM

Open in App

अयाज मेमन

भारत-पाकिस्तान यांच्यात रंगणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यात पावसाची शक्यता डोळ्यांसमोर ठेवून राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय अंतिम क्षणी घेण्यात आला. पण, या निर्णयामुळेच वादाची ठिणगी पडली आहे. गटफेरीतील भारत-पाक सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यानंतर आयोजकांवर खऱ्या अर्थाने दबाव आला. पण, मुळात हा दबाव आला तरी कुठून आणि कोणी आणला?

प्रसारकांचे धोरण तर्कसंगत

भारत-पाकिस्तान सामना हा कोणाच्याही आवडीचाच. मग प्रसारक आणि प्रायोजक तरी याला अपवाद कसे असतील? या सामन्याच्या लोकप्रियतेमुळेच प्रसारणावर बराच खर्च केला जातो. त्यामुळे गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळावा, ही कुठल्याही व्यापाऱ्याची स्वाभाविक इच्छा असते. प्रसारकांनी अवलंबिलेले धोरण तर्कसंगत आहे. भारत-पाक सामने झाले नाही, तर प्रसारकांना मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता असते. हाच सगळा व्यावसायिक खेळ डोळ्यांसमोर ठेवून प्रसारक, प्रायोजक आणि मोठ्या चाहत्या वर्गाकडून भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. म्हणजे, आज जर हा सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर उद्या सोमवारी पुन्हा तो खेळविण्यात येईल. 

बांगलादेश आणि श्रीलंकेचा विरोध

राखीव दिवस ठेवण्याच्या निर्णयाला श्रीलंका आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने विरोध दर्शविला आहे. आमच्याही सामन्यांसाठी हा निर्णय का घेण्यात आला नाही, असा प्रश्न दोन्ही बोर्डांकडून विचारण्यात आला. दुसरीकडे, लंकेचा आक्षेप असाही आहे की, आम्ही गतविजेते असूनही केवळ भारत-पाकवरच इतके लक्ष का केंद्रित केले गेले आहे? या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसमोर आपल्याला गौण समजले जात असल्याचा आरोपही लंका आणि बांगलादेश बोर्डाने केला आहे. मुळात हे आरोप अजिबात चुकीचे नाहीत.

सुरुवातीपासूनच राखीव दिवस का नाही?

‘आशिया चषकावर पावसाचे सावट’ ही भविष्यवाणी स्पर्धा सुरू होण्याआधीच करण्यात आली होती. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांपासूनच राखीव दिवस ठेवण्याचे प्रयोजन केले गेले असते तर कुणाला कशाचाही आक्षेप राहिला नसता. पण, यामुळे स्पर्धेचा कालावधी एका आठवड्याने वाढला असता, हेसुद्धा ध्यानात घ्यायला हवे. केवळ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठीच राखीव दिवस ठेवण्याचे आधी ठरविण्यात आले होते. गटफेरी आणि सुपर फोरचा यात समावेश नव्हता. भारत-पाक गटफेरीतील सामना रद्द झाल्यानंतर प्रसारकांना आर्थिक फटका बसला. परिणामी, आजच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, जर पुन्हा दोन्ही दिवस पाऊस राहिला तर प्रसारकांचा खिसा अजून रिकामा होऊ शकतो.

यातून काय शिकणार?प्रकरण गुंतागुंतीचे आहे. पण, मोठ्या स्पर्धांसाठी असा दुहेरी मापदंड अवलंबायला नको, असा धडाही आयोजकांना यातून मिळाला असेल. विशिष्ट संघांकडेच अधिक लक्ष आणि इतरांकडे दुर्लक्ष हे धोरण कुठेतरी थांबायला हवे. सध्या तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, त्याद्वारे भविष्यातील हवामानाचा आपण आताच अंदाज बांधू शकतो. त्यामुळे आयोजकांनी याचा योग्य अभ्यास करून स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घ्यायला हवा. आता राखीव दिवस तर ठेवला आहे. पण, या दिवशीसुद्धा पाऊस आला तर काय कराल? एकूण काय तर प्रत्येक संघाला समान अधिकार आणि वागणूक दिल्याने कुठल्याही खेळाचा शाश्वत विकास होत असतो.

(लेखक लोकमतमध्ये कन्सल्टींग एडिटर आहेत)

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कप 2023भारतीय क्रिकेट संघ
Open in App