इस्लामाबाद - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि नावाजलेला फलंदाज इंझमाम उल हकला ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर, सोमवारी सायंकाळी इंझमामवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे. इंझमामला गेल्या तीन दिवसांपासून छातीतील दुखण्याचा त्रास होत होता. त्यामुळे, त्याने सर्वकाही प्राथमिक वैद्यकीय चाचण्याही केल्या. मात्र, सोमवारी इंझमामला ह्रदविकाराचा सौम्य झटका आल्याचे निदान झाले.
क्रिकेट विश्वातील ईएसपीएन आणि क्रिकइन्फोने यासंदर्भात वृत्त दिले असून इंझमामला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थीर असल्याचे इंझमामच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. याबाबतचे वृत्त समजताच इंझमामच्या चाहत्यांनी त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे.
पाकिस्तान संघाचा मॅचविनर फलंदाज म्हणून इंझमामकडे पाहिलं जात. सन 2000 नंतरच्या पाकिस्तान संघात तो आघाडीचा फलंदाज होता. ५१ वर्षीय इंझमामने पाकिस्तानसाठी ३७५ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ११ हजार ७०१ धावा केल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंच्या यादीत इंझमाम तिसऱ्या स्थानी आहे. कसोटीमध्ये ११९ सामन्यांमध्ये त्याने ८ हजार ८२९ धावा केल्यात. तो पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.
२००७ साली इंझमाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यानंतर त्याने पाकिस्तान क्रिकेटशीसंबंधित अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तो आधी पाकिस्तानच्या संघासाठी फलंदाजी सल्लागार होता. नंतर २०१६ ते २०१९ दरम्यान तो पाकिस्तानी संघ निवडणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख निवडकर्ता म्हणून कार्यरत होता. इंझमामने अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे.