कोलकाता : भेदक गोलंदाजीमुळे दोन सामने जिंकून विजयी पथावर परतलेला गुजरात टायटन्स शनिवारी ईडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सच्या अपेक्षांवर पाणी फेरण्यास सज्ज दिसतो. केकेआरने सलग चार सामने गमावल्यानंतर मागच्या सामन्यात आरसीबीला नमविले होते.
स्थळ : ईडन गार्डन, वेळ : दुपारी ३.३० पासून
कोलकाता नाइट रायडर्स जेसन रॉय मैदान गाजवीत असताना आंद्रे रसेल, सुनील नरेन यांच्याकडून अपेक्षाभंग. कर्णधार नितीश राणा, रिंकू सिंग, डेव्हिड व्हिसे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा. प्ले ऑफसाठी उर्वरित सहापैकी किमान पाच सामने जिंकण्याची गरज.
गुजरात टायटन्स कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात शिस्तबद्ध गोलंदाजी आणि कौशल्यवान फलंदाजांचा संघात भरणा. राशीद खान, नूर अहमद यांची फिरकी, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया हे आक्रमक खेळीत तरबेज फलंदाज.
सनरायजर्सविरुद्ध कॅपिटल्स सलग दुसऱ्या विजयाच्या प्रयत्नात
नवी दिल्ली : सलग पाच सामने गमावल्यानंतर दोन सामने जिंकणारा दिल्ली कॅपिटल्स शनिवारी घरच्या मैदानावर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळणार असून, याआधीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा इरादा असेल. दिल्लीने सनरायजर्सविरुद्ध कमी धावसंख्येच्या सामन्यात हैदराबादमध्ये सात धावांनी विजय नोंदविला होता.
स्थळ : अरुण जेटली स्टेडियम, वेळ : सायंकाळी ७:३० पासून
दिल्ली कॅपिटल्स कर्णधार डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, अक्षर पटेल, मिशेल मार्श यांच्याकडून जबर खेळी अपेक्षित. अक्षर आणि कुलदीप यादव फिरकी माऱ्यात उपयुक्त. ईशांत शर्मा, एन्रिच नॉर्खिया, मुकेश कुमार यांच्याकडून कामगिरीची पुनरावृत्ती होणार?
सनरायजर्स हैदराबाद एडेन मार्करामच्या संघाला खराब सुरुवातीचा फटका बसला. मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा यांच्या फलंदाजीत सातत्य नाही. भुवनेश्वरचा वेगवान मारा प्रभावी; पण वॉशिंग्टन सुंदर बाहेर झाल्याने संघाला धक्का बसला.