मुंबई, आयपीएल 2019 : डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांची उणीव सनरायझर्स हैदराबादला गुरुवारच्या सामन्यात प्रकर्षाने जाणवली असावी. मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना हैदराबादने निर्धारित षटकांत बरोबरीत राखला खरा,परंतु सुपर ओव्हरमध्ये त्यांना हार पत्करावी लागली. विजयासाठी एका षटकात 9 धावांचे आवश्यक लक्ष्य मुंबईने तीन चेंडूत पार केले. हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला आणि मुंबईचा विजय पक्का केला. हार्दिकने यंदाच्या आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी केली आहे आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना त्याला चेंडू नक्की कोठे टाकावा हा प्रश्न पडला आहे. सहकारी जसप्रीत बुमराहने या प्रश्नाचे उत्तर मिळवले.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागील काही सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारलेले पाहायला मिळाले आहे. त्यामुळे रोहितचा हा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता. हाच रोहितचा गनिमी कावा होता. क्विंटन डी कॉकच्या (69) अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 162 धावांचा समाधानकारक पल्ला गाठला. प्रत्युतरात मनीष पांडे (71) वगळता हैदराबादच्या एकाही फलंदाजाला आत्मविश्वासाने खेळ करता आला नाही. तरीही त्यांनी सामन बरोबरीत सोडवला. पण, सुपर ओव्हरमध्ये त्यांना अपयश आले.
सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने हैदराबादच्या मनीष पांडेला धावबाद केले. बुमराहने टिच्चून मारा करताना हैदराबादला 2 बाद 8 धावांवर रोखले. त्यानंतर मुंबईने हार्दिक आणि किरॉन पोलार्ड या हिटर फलंदाजांना मैदानावर उतरवले. रशीद खानच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने खणखणीत षटकार खेचला आणि मुंबईच्या विजयाचा मार्ग सुकर केला. सामन्यानंतर बुमराहने हार्दिकला प्रश्न विचारला की, तुला गोलंदाजी करायची तर कशी?
त्यावर हार्दिक म्हणाला,"त्यांनी मला गोलंदाजी केलीच नाही तरी चालेल... पण संघातील वातावरण एवढं चांगलं आहे की आपोआप आत्मविश्वास वाढतो. मागील काही सामन्यांत कामगिरीही चांगली झाली आहे. त्यामुळे नक्कीच आत्मविश्वास वाढला आहे."
पाहा व्हिडीओ..
https://www.iplt20.com/video/185399/should-the-bowlers-stop-bowling-to-you-bumrah-asks-hardik
हार्दिकने 13 सामन्यांत 198.95 च्या स्ट्राइक रेटने 380 धावा केल्या आहेत.