Join us  

आयपीएल 2018 : ' या ' खेळाडूला पडले 16 टाके ; केकेआरची डोकेदुखी वाढली

केकेआरने यावेळी झालेल्या लिलावात एका अनुभवी गोलंदाजाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. पण या गोलंदाजाच्या डोक्याला 16 टाके पडले आहेत. त्यामुळे हा गोलंदाज किती सामन्यांमध्ये खेळणार, याची चर्चा संघ व्यवस्थापनामध्ये सुरु आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 5:55 PM

Open in App
ठळक मुद्देया दुखापतीतून तो कधी सावरणार आणि आयपीएलध्ये कधी खेळणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या हंगामाला अजून सुरुवातही झालेली नाही, पण तरीही कोलकाता नाइट रायडर्सला (केकेआर) मात्र मोठा धक्का बसण्याचे चिन्ह आहे. कारण केकेआरने यावेळी झालेल्या लिलावात एका अनुभवी गोलंदाजाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. पण या गोलंदाजाच्या डोक्याला 16 टाके पडले आहेत. त्यामुळे हा गोलंदाज किती सामन्यांमध्ये खेळणार, याची चर्चा संघ व्यवस्थापनामध्ये सुरु आहे. 

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनला जिममध्ये व्यायाम करत असताना जबर दुखापत झाली आहे. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची आहे की जॉन्सनच्या डोक्याला तब्बल 16 टाके पडले आहेत. त्यामुळे या दुखापतीतून तो कधी सावरणार आणि आयपीएलध्ये कधी खेळणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

जॉन्सनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली त्याने आपल्याला झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. याबाबत जॉन्सन म्हणाला की, " जिममध्ये व्यायाम करताना मला ही दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असली तरी त्यामधून मी आता सावरत आहे. पूर्वीपेक्षा आता माझी तब्येत सुधारत आहे. मी लवकरच तंदुरुस्त होऊन मैदानात परतेन."

जॉन्सनने ऑस्ट्रेलियाचे 73 कसोटी, 155 वनडे आणि 30 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले होते. आयपीएलमध्ये जॉन्सनने किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स या संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावर्षी केकेआरने जॉन्सनला आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे.

यंदाच्या आयपीएलला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे जॉन्सनला जर सुरुवातीपासून आयपीएलमध्ये खेळायचे असेल तर त्याच्याकडे जवळपास एका महिन्याचा अवधी असेल. यापूर्वी केकेआरचा ख्रिस लिन हा जायबंदी झाला होता. पण तो आता तंदुरुस्त झाला आहे. त्यामुळे आता केकेआरच्या संघ व्यवस्थापनाला चिंता असेल ती जॉन्सनच्या तंदुरुस्तीची.

टॅग्स :आयपीएल 2018कोलकाता नाईट रायडर्स