नालंदा : सात एप्रिल रोजी भारतात आयपीएलच्या 'रन'संग्रामाला सुरुवात झाली. सर्व दिग्गज क्रिकेटमधील या छोट्या प्रकारामध्ये षटकार - चौकारांची आतषबाजी करत स्वत:ला सिद्ध करत आहेत. तर दुसरीकडे तरुण जीव गमावत आहेत. भारतातील सट्टेबाजीमुळं 19 वर्षीय निष्पाप विद्यार्थाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकच्या चामराजनगरातील गुंडालुपेट येथे ही घटना घडली.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थाचे नाव गुरु असे असून तो नालंदाच्या आयटीआय कॉलेजमध्ये शिकत होता. गुरुने आयपीएलमधील एका सामन्यावर सट्टा लावला होता. आयपीएलवरील सट्टा हरल्यानंतर सट्टेबाजांनी त्याच्याकडे सतत पैशांचा तगादा लावला होता. सट्टेबाजांच्या त्रासाला वैतागून गुरुने शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुच्या मोबाइलमध्ये धमकावण्याचे मेसेज आढळून आले असून त्याच्या बॅगेत सट्ट्याची रक्कम आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर सट्टेबाजांनी त्याला धमकी दिल्याने त्रस्त झालेल्या गुरुने आत्महत्येचं पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी गुरु कॉलेजलाही गेला होता, पण तो वर्गात बसला नव्हता अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.