मुंबई: धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. फलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बंगळुरुनं हैदराबादला पराभूत केलं. या विजयात एबी डी'व्हिलियर्सनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. फलंदाजी करताना संघाला धावांचा डोंगर उभा करणाऱ्या डी'व्हिलियर्सनं त्यानंतर क्षेत्ररक्षणातही छाप पाडली. घणाघाती फलंदाजी करणाऱ्या हैदराबादच्या अॅलेक्स हेल्सचा सीमारेषेवर शानदार झेल घेत डी'व्हिलियर्सनं त्याला माघारी धाडलं. यामुळे सध्या सोशल मीडियावर डी'व्हिलियर्सची तुलना सुपरमॅन आणि स्पायडरमॅनशी केली जात आहे.
या सामन्यात बंगळुरुनं हैदराबादला 219 धावांचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच्या अॅलेक्स हेल्स आणि केन विल्यम्सनने तुफान फलंदाजी सुरु केली. तीन षटकार आणि दोन चौकार ठोकत हेल्सनं बंगळुरुच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यानंतर कोहलीनं फलंदाजीत चमक दाखवलेल्या मोईन अलीला गोलंदाजी दिली. बंगळुरुकडून आठवं षटकं टाकणाऱ्या मोईननं शेवटच्या चेंडूवर हेल्सला बाद केलं. हेल्सला मारलेला चेंडू आरामात सीमारेषेबाहेर जाईल, असं वाटत असताना डी'व्हिलियर्स अचूक वेळेत हवेत झेपावला आणि त्यानं शानदार घेतला. डी'व्हिलियर्सच्या या शानदार क्षेत्ररक्षणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. डी'व्हिलियर्सच्या अंगात स्पायडरमॅन आला होता की सुपरमॅन अशीही गमतीशीर चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे. कर्णधार विराट कोहलीनंदेखील डी'व्हिलियर्सच्या या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं आहे.