नवी दिल्ली : स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ' हा ' खेळाडूही आयपीएलमधून बाहेर पडला आहे. चेंडूशी छेडछाड केल्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर यांची आयपीएलमधून उचलबांगडी करण्यात आली होती. पण ऑस्ट्रेलियाचा वेगावान गोलंदाज मिचेल स्टार्क हा या आयपीएलमध्ये दुखापतीमध्ये खेळू शकणार नाही. आयपीएलमधून बाहेर पडणारा स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या कसोटी मालिकेत स्टार्क हा संघाचा अविभाज्य भाग होता. पण स्टार्कच्या डाव्या पायाला दुखापत झाली असल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा कसोटी सामना खेळणार नाही. स्टार्कची ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला आयपीएललाही मुकावे लागणार आहे.
स्टार्क हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या संघातून खेळणार होता. कोलकाताच्या संघाने स्टार्कला तब्बल 9.4 कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. यापूर्वी स्टार्क रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडूनही खेळला होता.
यंदाच्या आयपीएलच्या मोसमाला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियान्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सलामीचा सामना रंगणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 27 मे रोजी खेळवला जाणार आहे.