Join us  

IPL 2018: ...म्हणून पर्पल कॅप मिळताच 'तो' स्फुंदून-स्फुंदून रडू लागला!

अँड्र्यू टायनं ४ षटकांत ३४ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2018 11:59 AM

Open in App

जयपूरः राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला पराभव पत्करावा लागला असला, तरी अँड्र्यू टाय या त्यांच्या गोलंदाजानं सगळ्यांची मनं जिंकून घेतली. त्यानं केलेली कामगिरी 'जबरा' होतीच, पण 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीनुसार, आजीच्या निधनाचं दुःख मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून तो मैदानात उतरला होता. हे दुःख 'पर्पल कॅप' घेताना अश्रूंवाटे बाहेर पडलं आणि क्रिकेटप्रेमींनी त्याच्या जिद्दीला, जिगरबाज वृत्तीला दाद दिली.  

अँड्र्यू टायनं ४ षटकांत ३४ धावा देऊन राजस्थानच्या  ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याच्या नावावर आता १६ विकेट्स जमा झाल्यात. त्याचं बक्षीस म्हणून पहिली इनिंग्ज संपल्यावर त्याला ग्रॅमी स्मिथच्या हस्ते पर्पल कॅप देण्यात आली. ही मानाची कॅप घेताना, तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला. काही जणांना हे आनंदाश्रू असल्याचं वाटलं. पण, टायनं खरं कारण सांगताच, सगळेच क्षणभर स्तब्ध झाले. 'आजच माझ्या आजीचं निधन झालं. माझी ही कामगिरी मी तिला आणि माझ्या संपूर्ण परिवाराला समर्पित करतो. हा सामना माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचा होता. आजीच्या जाण्याचं दुःख बाजूला ठेवून खेळणं कठीण होतं', अशा हळव्या भावना टायनं व्यक्त केल्या. तेव्हा, स्मिथनं त्याचं सांत्वन केलं आणि आधार दिला. टायने आजीच्या स्मृतिप्रित्यर्थ खांद्याला काळी पट्टी बांधली होती आणि त्यावर 'ग्रँडमा' असं लिहिलं होतं. 

दुर्दैवानं, टायची ही चमकदार कामगिरी आणि के एल राहुलची दमदार फलंदाजी व्यर्थ ठरली. राजस्थाननं पंजाबचा १५ धावांनी पराभव केला. 

IPL-11 मधील 'टॉप फाइव्ह' गोलंदाज

१. अँड्र्यू टाय (किंग्स इलेव्हन पंजाब) - १० सामने - १६ विकेट्स२. हार्दिक पंड्या (मुंबई इंडियन्स) - ९ सामने - १४ विकेट्स३. मुजीब-उर-रहमान (किंग्स इलेव्हन पंजाब) - १० सामने - १४ विकेट्स४. उमेश यादव (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) - १० सामने १४ विकेट्स५. मयांक मार्कंडे (मुंबई इंडियन्स) - १० सामने १३ विकेट्स

टॅग्स :आयपीएल 2018राजस्थान रॉयल्सकिंग्ज इलेव्हन पंजाब