मुंबई : पहिल्या दोन सामन्यांत सनसनाटी विजय मिळवून आयपीएलमध्ये झोकात पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का बसला आहे. केदार जाधवनंतर आता चेन्नईचा अजून एक धडाकेबाज खेळाडू या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. एका मागे एक अनेक झटके चेन्नईला लागत आहेत. पहिल्या सामन्यात केदार जाधव दुखापतीमुळे बाहेर झालाय त्यानंतर लगेचच रैना देखील दुखापतीमुळे बाहेर झाला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी देखील स्पर्धा सोडून मायदेशी गेला आहे. वडिलांच्या अचानक निधनाने त्याला जावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वीचं त्यांचं ऑपरेशन झालं होतं. पण त्यानंतर काल अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली. त्यामुळे एनगिडी मायदेशी परताला आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज आज रविवारी किंग्ज इलेव्हन विरुद्ध आपली विजयाची लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर अत्यंत रोमहर्षक सामन्यात विजय मिळवल्यानंतर चेन्नईने दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली.ड्वेन ब्राव्हो व सॅम बिलिंग्ज यांच्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने हे दोन्ही सामने जिंकले. त्या शिवाय संघात कर्णधार धोनी, शेन वॉटसन, अंबाती रायुडू , फाफ डू प्लेसिस, रवींद्र जडेजा यांसारखे अनेक ‘मॅचविनर’ खेळाडू आहेत. गोलंदाजीत हरभजन, जडेजा इम्रान ताहिर, वॉटसन, शार्दूल ठाकूर यांनी आपली छाप पाडली आहे. दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबला मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पराभूत केले. पहिल्या सामन्यात पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सला सात गड्यांनी पराभूत केले होते. के. एल. राहुलने या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावले होते.