मुंबई - हैदराबाद आणि मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर आज सामना रंगणार आहे. शिखर धवन दुखापतीमुळे गेल्या सामनयात खेळला नव्हता. आज मुंबई विरोधात होणाऱ्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हैदराबाद संघाचा कर्णधार केन विलियम्सनने माध्यमांशी बोलताना भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीबाबत माहिती दिली. भुवनेश्वर कुमारच्या कंबरेला दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. भुवनेश्वर कुमार मुंबईमध्येही आलेला नाही. त्यामुळं भुवनेश्वर कुमार मुंबईच्या विरोधात खेळणार नाही. पण गेल्या सामन्यात दुखापतीमुळं न खेळू शकलेला सलामीवीर शिखर धवन मुंबई विरोधात खेळेल.
सनरायझर्स हैदराबादने सलग तीन सामने जिंकत यंदाच्या सत्राची धडाक्यात सुरुवात केली, परंतु किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या सलग पराभवामुळे त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थान गमवावे लागले. त्यामुळेच पुन्हा विजयी मार्गावर परतण्यासाठी ते मुंबईला नमविण्यास सज्ज असतील. कर्णधार केन विलियम्सन जबरदस्त फॉर्ममध्ये असून, त्याने ५ सामन्यांत २३० धावा कुटल्या आहेत, तसेच शिखर धवन, रिद्धिमान साहा यांच्यासह इतर फलंदाजांकडून अद्याप त्याला अपेक्षित साथ मिळालेली नाही. त्याच वेळी ‘स्विंगचा बादशाह’ भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत हैदराबादचे गोलंदाज कशी कामगिरी करतात यावर संघाचा विजय अवलंबून आहे. अशा परिस्थितीत हैदराबादविरुद्ध गोलंदाजांना आपली कामगिरी सुधारावी लागेल.