हैदराबादः आयपीएल-११ मध्ये अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास सोमवारी सनरायझर्स हैदराबादनं हिरावून घेतला. त्यामुळे विराटसेनेचं आव्हान संपल्यात जमा आहे. रॉयल चॅलेंजर्सचं 'चॅलेंज' निकाली काढण्यात प्रमुख भूमिका बजावली ती, भुवनेश्वर कुमारनं. शेवटच्या षटकात त्याच्या प्रत्येक चेंडूगणिक विराट कोहलीचं विजयाचं स्वप्न उद्ध्वस्त होत गेलं.
बेंगलोरच्या गोलंदाजांनी हैदराबादला १४६ धावांवर रोखलं होतं. विराटसेनेतील रथी-महारथी फलंदाजांसाठी हे आव्हान फारसं कठीण नव्हतं. परंतु, हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत त्यांना रोखून धरलं आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. त्यात बेंगलोरला १२ धावा करायच्या होत्या. पण, भुवनेश्वरनं प्रत्येक चेंडू चलाखीनं टाकत त्यांना १४१ धावांवरच रोखलं आणि हैदराबादनं आठवा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं.
भुवनेश्वरची २०वी ओव्हर
१९.१ ओव्हर - १ धाव१९.२ ओव्हर - २ धावा१९.३ ओव्हर - १ धाव१९.४ ओव्हर - १ धाव१९.५ ओव्हर - १ धाव (लेग बाय)१९.६ ओव्हर - ग्रँडहोम क्लीन बोल्ड
भुवनेश्वर कुमारने रॉयल चॅलेंजर्सविरोधात एकूण ४ षटकांत २७ धावा देऊन एक विकेट घेतली. त्यात दहा चेंडू निर्धाव होते. बेंगलोरच्या पराभवात या 'दस का दम'चा मोठा वाटा होता. शाकिब-अल-हसन आणि राशिद खाननंही कट्टर गोलंदाजी केली. बेंगलोरला दहापैकी सात सामन्यात पराभव पत्करावा लागला असून गुणतालिकेत ते शेवटून तिसऱ्या स्थानावर आहेत.
सनरायझर्स हैदराबादनं याआधीही तगड्या गोलंदाजीच्या जोरावर, कमी लक्ष्याचा बचाव करण्याची किमया केली आहे. त्यांच्या प्रभावी माऱ्यापुढे, मुंबई इंडियन्सला ११९ धावांचं आव्हानही पेलवलं नव्हतं. त्यांना मुंबईचा ८७ धावांवर धुव्वा उडवला होता.