नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलमध्ये बाद फेरीत पोहोचण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा संघ प्रयत्न करत आहे. रविवारी राजस्थानने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत बाद फेरीच्या दिशेने कूच केली आहे. पण राजस्थानला सोमवारी सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण संघाचा मुख्य मार्गदर्शक शेन वॉर्न हा संघाला सोडून मायदेशी परतणार आहे.
रविवारी राजस्थानने मुंबईवर सात विकेट्स राखून विजय मिळवला होता. या विजयासह राजस्थानने 12 गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला राजस्थानची कामगिरी कशी होते, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागलेली आहे.
या परिस्थितीत वॉर्नचे सोडून जाणे, हा राजस्थानसाठी मोठा धक्का असेल. कारण पहिल्या हंगामापासून वॉर्न हा राजस्थानच्या संघाचा एक अविभाज्य भाग आहे. पहिल्या हंगामात तर संघाचे नेतृत्व करताना त्याने राजस्थआनला जेतेपद जिंकवून दिले होते. त्यानंतरही संघातील खेळाडूंना तो मार्गदर्शन करत होता. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूबद्दल वॉर्नला चांगली माहिती होती. त्यामुळे त्याचे असे अचानक मायदेशी निघून जाणे राजस्थानला चटका लावणारे आहे.
" सोमवारपासून मी राजस्थानच्या संघाचा एक भाग नसेन. कारण मला मायदेशी परतावे लागणार आहे. त्यामुळे यापुढे मी राजस्थानच्या संघाबरोबर नसेन. आयपीएलशी संलग्न असणं, ही फार मोठी बाब होती. पण आयपीएल सोडणे, हे माझ्यासाठी दुर्देवी आहे, " असे वॉर्नने सांगितले आहे.
वॉर्नने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. त्यानुसार तो आता राजस्थानच्या संघाचा एक भाग नसेल, हे स्पष्ट होत आहे. पण राजस्थानचे मार्गदर्शकपद सोडून तो मायेदशीत का परतत आहे, याबाबत वॉर्नने कोणतीही माहिती दिलेली नाही.