मुंबई - क्रिकेटमधील विक्रम मोडण्याची जणू सवयच लागलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने काल टी-२० क्रिकेटमध्ये एक 'विराट' विक्रम रचला आहे. एकाच संघासाठी 5000 धावा करण्याचा भीमपराक्रम आजपर्यंत जगातील एकाही फलंदाजाला जमलेला नाही. विराटने काल मुंबईविरुद्धच्या सामन्यात 49 वी धाव घेताच या विक्रमाला गवसणी घातली आहे. बेंगळुरूसाठी विराट कोहलीनं 159 डावांत 5043 धावा केल्या आहेत. काल विराट कोहलीनं मुंबईविरुद्ध खेळाताना 92 धावांची खेळी केली. विराटने 49 वी धाव घेताच एकाच संघाकडून त्याच्या 5000 धावा पूर्ण झाल्या आणि एकाच संघाकडून खेळताना हा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरेला.
विराट कोहली 2008 पासून आरसीबी संघाकडून खेळत आहे. आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीनं 153 सामन्यांत 4619 धावा केल्या आहेत.त्यात 4 शतकं आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याशिवाय, 2009 ते 2011 दरम्यान आरसीबीसाठीच चॅम्पियन्स लीगमध्ये 14 डावात 424 धावा केल्या आहेत.
रैनाचा विक्रम मोडला -
विराटनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं या सामन्यात 32 वी धाव घेऊन रैनाचा विक्रम मोडला आहे. हा विक्रम विराटने त्याच्या 153 व्या सामन्यात केला आहे. त्याने हा विक्रम करताना रैनापेक्षा 10 सामने कमी खेळले आहेत. सुरेश रैनानं आयपीएलच्या 163 सामन्यांमध्ये 4558 धावांचा रतीब घातला होता. विराट कोहलीनं 153 व्या सामन्यात हा विक्रम मोडला. त्यामुळं त्याच्या नावावर आता 153 सामन्यांमध्ये 4619 धावांचा इमला उभा राहिला आहे.
विराट खेळी व्यर्थ, मुंबईचा विजय -
पहिल्या तीन सामन्यांत पराभवाची चव चाखल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 11व्या पर्वात आपल्या विजयाचा श्रीगणेशा केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 46 धावांनी धूळ चारत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने विजय संपादन केला. रोहित शर्मा आणि इविन लुइस यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने 213 धावांचा डोंगर उभा केला. बंगळुरूचे दिग्गज शिलेदार एकापाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये परतत असताना विराट कोहली तटबंदीप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत होता. पण अखेर बंगळुरूला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.