मुंबई - आयपीएलमधील सगळ्यात यशस्वी संघ असलेल्या, तीन जेतेपदांवर नाव कोरलेल्या मुंबई इंडियन्सला आयपीएल-११ मधून प्ले-ऑफआधीच गाशा गुंडाळावा लागला आहे. कर्णधार रोहित शर्माला न गवसलेला सूर, फलंदाजांची हाराकिरी, घरच्या मैदानावर झालेली निराशा ही त्यामागची काही कारणं असली, तरी खेळाडूंच्या लिलावादरम्यान संघमालक अंबानींनी केलेली एक चूक त्यांना भारीच महागात पडलेली दिसते. ती म्हणजे जोस बटलर आणि अंबाती रायुडू यांना 'रिटेन' न करण्याचा निर्णय.
यंदाच्या आयपीएलमध्ये अंबाती रायुडू चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय, तर राजस्थान रॉयल्सला प्ले-ऑफपर्यंत घेऊन जाण्यात जोस बटलरने मोलाची भूमिका बजावलीय. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत हे दोघं टॉप फाइव्हमध्ये आहेत. अंबाती रायुडूनं सलामीवीराची भूमिका चोख बजावली. १४ सामन्यांत एका शतकासह त्यानं ५८६ धावा केल्यात, तर जोस बटलरनं १३ सामन्यांत ५४८ धावा फटकावल्यात.
हे दोघंही वीर गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होते. पण, त्यांच्या ताकदीचा पुरेपूर वापर मुंबईला करून घेता आला नाही, असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. अर्थात, मुंबईच्या विजयात त्यांनी योगदान दिलं, पण यंदा त्यांनी जो पराक्रम केला, तो त्यांना तिथे करता आला नव्हता. 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी आणि अजिंक्य रहाणेनं या शिलेदारांची क्षमता अचूक हेरली. या दोघांनाही सलामीला पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याचा दोन्ही संघांना मोठा फायदा झाला. याउलट, त्यांना आपल्यासोबत कायम न ठेवण्याचा फटका मुंबईला बसला.
यष्टिरक्षक-फलंदाज अंबाती रायुडूवर चेन्नई सुपर किंग्सनं २ कोटी २० लाख रुपयांची बोली लावली होती. राइट-टू-मॅच कार्ड वापरून मुंबई त्याला तेवढ्याच किंमतीत आपल्याकडे घेऊ शकली असती, पण त्यांनी हे कार्ड वापरलं नाही. तसंच, जोस बटलरला राजस्थाननं ४ कोटी ४० लाख रुपयांना खरेदी केलं. तेव्हाही, आकाश आणि नीता अंबानी शांत राहिले होते. त्यावेळी त्यांनी वेगळा निर्णय घेतला असता, तर कदाचित आज वेगळं चित्र दिसू शकलं असतं. मुंबई इंडियन्स जेतेपदाच्या शर्यतीत असती. दरम्यान, ख्रिस गेल आणि शेन वॉटसन या दोघांना 'रिटेन' न करण्याची किंमत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चुकवावी लागली आहे.